कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दराचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत आंदोलनाची धग वाढली आहे. केंद्र सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर हजारो शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, ऊसदराच्या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २५ व्या ऊस परिषदेत निश्चित करण्यात आलेल्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. साखरेचा किमान विक्रीभाव प्रतिकिलो ५० रुपये करावा, सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करावा आणि लवकर गळीत हंगाम सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देऊन उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, अशा तीन प्रमुख मागण्या संघटनेने पुढे केल्या आहेत. या मागण्यांवर ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली आहे.
केंद्रासोबतची बैठक निष्फळ; आश्वासनाने शेतकऱ्यांचे समाधान नाही
ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत सुमारे तीन तास बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी एका आठवड्यात समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, केवळ समिती स्थापन करण्याच्या आश्वासनावर शेतकरी समाधानी नसल्याने आंदोलनाचा मार्ग कायम ठेवण्यात आला.
बैठक निष्फळ ठरल्यानंतर मंगळवारी कोगनोळी टोलनाक्यावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमली. आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
‘लेखी निर्णयाशिवाय महामार्ग मोकळा नाही’
राजू शेट्टी यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना सरकारला थेट इशारा दिला. ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने लेखी निर्णय जाहीर केल्याशिवाय महामार्ग एक इंचही मोकळा केला जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. १५ नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सरकारने तातडीने तोडगा काढला नाही, तर साखर कारखान्यांतून बाहेर पडणारी साखरही अडवण्यात येईल आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला. त्यामुळे आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘पहिली उचल पाच हजार रुपये द्यायला तुमच्या काकाने ठेवलेत का?’
ऊसदराच्या मागणीवरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्षालाही धार आली आहे. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राजू शेट्टी यांच्या पाच हजार रुपये प्रतिटन दराच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘पहिली उचल पाच हजार रुपये द्यायला तुमच्या काकाने ठेवलेत का?’ अशा शब्दांत त्यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली.
या टीकेला राजू शेट्टी यांनीही आक्रमक प्रत्युत्तर दिले. ‘उसाचा दर जाहीर न करता ऊस तोडायला ती काय तुमच्या बापाची पेंड आहे का?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला. या शाब्दिक संघर्षामुळे ऊसदराचा प्रश्न केवळ आर्थिक मागण्यांपुरता मर्यादित न राहता शेतकरी संघटना आणि साखर उद्योगातील संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे.
गळीत हंगामापूर्वीच संघर्ष तीव्र
एकीकडे साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणींचा मुद्दा मांडला जात असताना दुसरीकडे उत्पादन खर्च, उसाला मिळणारा दर आणि साखरेच्या किमान विक्रीभावाचा प्रश्न उपस्थित करत शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. केंद्र सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी व्यापक करण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.
कोगनोळी टोलनाक्यावरील बेमुदत आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, कोल्हापूर-सांगली परिसरातील ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लेखी निर्णय घेते की आंदोलनाची धग आणखी वाढते, याकडे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.


