रणजित मस्के, गुन्हे वार्ताहर
वाशिम : रिसोड येथील चंदनचोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात वाशिम स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी सलमान खान अजिज खान (३५), शेख चंदन शेर नुर मोहम्मद (३८) आणि अब्दुल रहीम अब्दुल रज्जाक (३७), तिघेही रा. रिसोड, यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चंदनाचे १६ नग, वजन नऊ किलो, असा २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गजानन नागाप्पा माळोकर यांच्या फिर्यादीवरून २४ सप्टेंबर २०२६ रोजी रिसोड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. अप.क्र. ८८९/२०२६ आणि अप.क्र. ९३४/२०२६ या दोन्ही गुन्ह्यांची नोंद भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये करण्यात आली होती. या प्रकरणांतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तिन्ही संशयितांना रिसोड येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर चोरीला गेलेले चंदनाचे १६ नग पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास रिसोड पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, पोलीस अंमलदार अमोल इरतकर, दीपक धुगे आणि चालक सुनील तायडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.


