मुंबई प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलनाला अचानक निर्णायक वळण मिळाले. शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी आंदोलनात उतरत पोलिसांच्या कारवाईला जोरदार विरोध केला. आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला घेराव घालत तिन्ही ठाकरे बंधूंनी आंदोलकांच्या सुटकेसाठी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडले. या घडामोडीमुळे शिवाजी पार्क परिसरातील वातावरण चांगलेच तापले.
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आणि डाव्या संघटनांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असतानाच मुंबईतही सरकारविरोधी आंदोलनाचे पडसाद उमटले. शिवाजी पार्क परिसरात आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सकाळपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोठ्या पिंजरा गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाईही सुरू होती.
पोलिसांच्या वाहनाला घेराव; आदित्य ठाकरे आक्रमक
रविवारी दुपारी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर परिस्थितीने वेगळे वळण घेतले. पोलिसांच्या वाहनातून काही आंदोलकांना घेऊन जात असताना ठाकरे बंधू आणि त्यांच्या समर्थकांनी वाहनाला घेराव घातला. आंदोलकांना सोडल्याशिवाय वाहन पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
यावेळी आदित्य ठाकरे पोलिसांच्या वाहनावर चढून घोषणाबाजी करताना दिसले. अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही आंदोलकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. तिन्ही ठाकरे बंधू एकाच वेळी आंदोलनात उतरल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आणि परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडण्यात आल्यानंतर आंदोलनाला आणखी धार आली.
‘आता इथून हलणार नाही’; आदित्य ठाकरेंचा इशारा
आदित्य ठाकरे यांनी या कारवाईवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. “आता हे आंदोलन शांत होणार नाही. आम्ही रात्र झाली तरी इथून हलणार नाही. सर्व विभागप्रमुखांना बोलावले आहे,” असा इशारा त्यांनी दिला. मुंबई पोलीस आज दिल्ली पोलिसांसारखे वागल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनस्थळी येण्याचे आवाहन केले.
अमित ठाकरे शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देऊन
दरम्यान, सकाळपासून आंदोलनात सक्रिय असलेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण अधिक तापले. अमित ठाकरे शिवसेना भवन परिसरातून शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर गेले आणि तेथे ठिय्या देऊन बसले. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही पोलीस ठाण्यात दाखल झाले.
तिन्ही ठाकरे बंधू आंदोलनात सक्रिय झाल्याने शिवाजी पार्क परिसरात आंदोलक आणि पोलिसांची मोठी गर्दी जमली. ठाकरे गटाचे तसेच मनसेचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने परिसरात पोहोचू लागले. मनसेकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कवर येण्याचे आवाहन करण्यात आले.
शिवाजी पार्कला जंतरमंतरचे स्वरूप
दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला मुंबईतूनही पाठिंबा मिळत असल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट झाले. सकाळपासून आंदोलन रोखण्यासाठी बंदोबस्त लावणाऱ्या पोलिसांसमोर ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेमुळे नवी परिस्थिती निर्माण झाली. आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईला विरोध, पोलिसांच्या वाहनाला घेराव आणि पोलीस ठाण्याबाहेरील ठिय्या यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली.
ठाकरे बंधूंच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे शिवाजी पार्क परिसराला दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाचे स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झाली. आंदोलकांच्या सुटकेनंतरही सरकारविरोधातील नाराजी कायम असल्याने मुंबईतील या आंदोलनाने राजकीय वातावरण ढवळून काढले.


