धुळे प्रतिनिधी
धुळे : जामखेड येथील कला केंद्रातील वादाचे पर्यवसान गर्भवती महिलेच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव-धुळे महामार्गालगत गरताडबारी येथील निर्जन परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पिंकी हनुमंत काटकर (वय 31, रा. रोहा, जि. रायगड) अशी पटली आहे. तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय असून, या घटनेत तिच्या पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा मोहाडी नगर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावत चार संशयितांना अटक केली आहे. त्यामध्ये सफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (38), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (31), स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (28) आणि लक्ष्मी बालाजी पवार (30) यांचा समावेश आहे. तर आणखी एका महिला आणि एका पुरुष संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नेमका वाद कशावरून?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जामखेड येथील एका कला केंद्रात महिला आणि पुरुषांमध्ये झालेल्या वादानंतर पिंकी काटकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, पिंकी काटकर आणि संशयितांचा परस्पर संबंध काय होता आणि हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.
निर्जन परिसरात जळालेला मृतदेह
२२ सप्टेंबर रोजी डायल ११२ वर गरताडबारी परिसरात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मोहाडी नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला महिलेची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. विविध पातळ्यांवर तपास करत पोलिसांनी अखेर मृत महिलेची ओळख पटवली.
शवविच्छेदनादरम्यान महिला गर्भवती असल्याचे समोर आले. तिच्यासोबत पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तपास अधिक गांभीर्याने सुरू केला.
सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशनमधून आरोपींचा माग
हत्येचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा आधार घेत संशयितांचा माग काढला. उपलब्ध पुराव्यांची सांगड घालत पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत चार संशयितांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा क्रमांक 322/2026 दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित सफराज मोमीन याच्याविरोधात धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
फरार संशयितांच्या भूमिकेकडे लक्ष
पिंकी काटकर यांच्या हत्येमागे पूर्वनियोजित कट होता का, कला केंद्रातील वादाचे स्वरूप काय होते, हत्येपूर्वी नेमके काय घडले आणि फरार असलेल्या दोन्ही संशयितांची या प्रकरणातील भूमिका काय होती, याचा उलगडा पोलिसांच्या पुढील तपासातून होणार आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांवरील आरोप सध्या तपासाधीन असून, पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


