मुंबई प्रतिनिधी
मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये गुन्हेगारीचे वाढते प्रकार आणि खुलेआम होणारे प्राणघातक हल्ले यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच बुधवारी (११ नोव्हेंबर) मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात भरदुपारी गोळीबाराची थरारक घटना घडली. मकडवाला कंपाऊंड, हलाव पुलाजवळ झालेल्या या गोळीबारात ४० वर्षीय विनोद मल्लाप्पा पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्यांचा सख्खा भाऊ बाबू पवार यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. एकाच कुटुंबातील दोन भावांची हत्या झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर संतप्त कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दोषींना अटक होत नाही, तोपर्यंत विनोद पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशाराही कुटुंबीयांनी दिला.
नेमकी घटना काय?
बुधवारी दुपारी सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास कुर्ला पश्चिमेतील मकडवाला कंपाऊंड परिसरात ही घटना घडली. विनोद मल्लाप्पा पवार हे परिसरात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विनोद पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच व्ही. बी. नगर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदूक जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोर कोणत्या मार्गाने आले आणि कोणत्या दिशेने पसार झाले, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदविण्यात येत आहेत. या प्रकरणात नेहल पवार याच्यावर संशय व्यक्त केला जात असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याच्या सहभागाबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
सहा महिन्यांत दोन सख्ख्या भावांची हत्या!
या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे विनोद पवार यांच्या कुटुंबावर यापूर्वीही असाच आघात झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे सख्खे भाऊ बाबू पवार यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. आता विनोद पवार यांचाही त्याच पद्धतीने मृत्यू झाल्याने या दोन्ही हत्यांमागे एकाच वादाची पार्श्वभूमी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुर्ल्यातील दोन गटांमधील वर्चस्वाच्या संघर्षातून या घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, या संघर्षातील संबंधित व्यक्ती एकाच कुटुंबाशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला कौटुंबिक वाद, जुने वैमनस्य आणि स्थानिक वर्चस्वाची लढाई अशा अनेक बाजू असल्याचे चित्र आहे.
विनोद पवार यांच्या हत्येनंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमवला. पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद व झटापट झाल्याचेही वृत्त आहे. परिसरातील तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
पुण्यातही पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या
मुंबईतील गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली असतानाच पुण्यातही पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात प्रकाश ऊर्फ लाल्या येवले (वय २७) याच्यावर धारदार शस्त्रांनी आणि लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली.
८ नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास प्रकाश येवले दुचाकीवरून जात असताना हल्लेखोरांनी त्याला अडवले. त्यानंतर त्याच्यावर कोयत्यासह धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी विकी मोरे आणि अनिकेत मालपोटे या दोघांना अटक केली असून अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. गणेश मंडळाशी संबंधित वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मुंबई, ठाणे आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये एकापाठोपाठ घडणाऱ्या हत्या, गोळीबार आणि टोळीयुद्धाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदुपारी वर्दळीच्या परिसरात गोळ्या झाडल्या जात असतील आणि जुन्या वादातून जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कुर्ल्यात सहा महिन्यांत दोन सख्ख्या भावांची हत्या होणे ही केवळ गुन्हेगारीची घटना नसून पोलिसांच्या प्रतिबंधात्मक यंत्रणेपुढील मोठे आव्हान आहे. या हत्यांमागील संपूर्ण कट, आरोपींचे नेटवर्क आणि दोन्ही गटांमधील वादाची पार्श्वभूमी उघड करून दोषींना कठोर शिक्षा मिळणे आवश्यक आहे. आता मुंबई पोलिसांच्या तपासातून या दुहेरी हत्याकांडामागील नेमके सत्य कधी समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


