नवी दिल्ली वृत्तसंस्था
डोंबिवलीतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या त्यांच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, तीन दिवसांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे म्हात्रे यांना पुन्हा कोठडीत जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी बाजू मांडली.
हा खटला मॅजिस्ट्रेट न्यायालयासमोर चालणारा असून, संबंधित मुख्य गुन्ह्यासाठी कमाल पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचा युक्तिवाद दवे यांनी केला. तसेच, दोन साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या असून, तक्रारदार महिला डॉक्टरांची साक्ष ३ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. म्हात्रे यांनी यापूर्वी काही काळ कोठडीत घालवला असून ते तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेला सहकार्य करत असल्याचेही त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.
१९ गुन्ह्यांचा उल्लेख; १८ प्रकरणांत निर्दोष सुटल्याचा दावा
सुनावणीदरम्यान राज्य सरकारने म्हात्रे यांच्या विरोधातील विविध गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख केला. त्यांच्या विरोधात एकूण १९ प्रकरणे असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. त्यावर म्हात्रे यांच्या वकिलांनी यापैकी १८ प्रकरणांत ते निर्दोष सुटल्याचा दावा केला.
या प्रकरणांवरही सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रकरणांच्या नोंदी मागवण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा या सुनावणीदरम्यान महत्त्वाचा ठरला.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या उपचारावरून झालेल्या वादानंतर डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांवर आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
घटनेनंतर डॉक्टरांच्या संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आणि त्यांना कोठडीत पाठवण्यात आले.
पुढे मुंबई उच्च न्यायालयाने काही अटींसह त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आता उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाला स्थगिती देत तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशामुळे डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.


