गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली : भामरागड तालुक्यासह शेजारील छत्तीसगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी दुर्गम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून, रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.
या पूरपरिस्थितीत गंभीर आजारी असलेल्या तीन रुग्णांना तातडीने पुढील उपचार मिळावेत यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने ही आपत्कालीन वैद्यकीय मदत मोहीम राबविली.
बिनागुंडा परिसरातील पूरस्थितीमुळे वाहतुकीचे मार्ग अडचणीत आले आहेत. या परिस्थितीत सात वर्षीय संगीता चुक्कू उसेंडी हिला गंभीर प्रकृतीमुळे लाहेरी येथून हेलिकॉप्टरद्वारे हेडरी येथे हलविण्यात आले. तसेच अपेक्षा ऋषी आलाम आणि रोशन चिना मडावी या दोघांनाही पुढील उपचारांसाठी हेडरी येथे नेण्यात आले. त्यापैकी एका रुग्णाला सिकलसेलचा त्रास असल्याचे सांगण्यात आले.
दुर्गम भागातील रस्ते पूरामुळे बंद असल्याने रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी लॉइड्स मेटल्स कंपनीचे हेलिकॉप्टर आपत्कालीन सेवेसाठी वापरण्यात आले. आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत आणि भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी रुग्णांच्या स्थलांतरासाठी आवश्यक समन्वय साधला.
रुग्णांसोबत निर्मला आलाम आणि चिना कुड्यामी हे देखील होते. पूरामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था करून तीन रुग्णांना सुरक्षितपणे पुढील उपचारासाठी हलविले. त्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली.


