मुंबई प्रतिनिधी
दुबईहून तेल अवीवकडे निघालेल्या ‘फ्लाय दुबई’च्या विमानात हवेतच घडलेल्या थरारक घटनेने जगाचे लक्ष वेधले आहे. विमान 34 हजार फूट उंचीवर असताना कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाने कॅप्टन स्मित माछार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी होऊनही माछार यांनी प्रसंगावधान राखत कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि बाहेरील व्यक्तींना मदतीची संधी मिळवून दिली. त्यांच्या या धाडसामुळे विमानातील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे.
फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातून ‘7700’ हा आपत्कालीन स्क्वॉक कोड प्रसारित करण्यात आला. त्यानंतर ‘7500’ हा कोड पाठवण्यात आला, जो विमान हायजॅक किंवा बेकायदेशीर हस्तक्षेपाची परिस्थिती दर्शवतो. यामुळे विमानाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली. त्याचदरम्यान कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाने कॅप्टन माछार यांच्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतरही कॅप्टन माछार यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रतिकार करत कॉकपिटचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच एका प्रवाशाने तातडीने कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोर सह-वैमानिकाला खाली पाडले. त्यानंतर इतर प्रवासी आणि केबिन क्रूच्या मदतीने त्याला नियंत्रणात आणण्यात आले. पुढे अतिरिक्त वैमानिकांनी विमानाचे नियंत्रण हाती घेतले.
घटनेनंतर विमानाने मार्ग बदलला आणि सौदी अरेबियाच्या दिशेने वळवण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने इस्रायली फायटर जेट्सने विमानाला एस्कॉर्ट केले. अखेर विमानाचे सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या संपूर्ण घटनेत कॅप्टन माछार यांनी दाखवलेल्या धैर्याचे विशेष कौतुक केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर कॅप्टन माछार यांच्या धाडसाचे कौतुक केले. गंभीर परिस्थितीत स्वतः जखमी असूनही त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेल्या धैर्याचा उल्लेख मोदी यांनी केला. त्यांच्या शौर्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगत भारताला त्यांचा अभिमान असल्याचेही मोदी यांनी म्हटले.
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनीही माछार यांच्या धाडसाला सलाम केला. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी हल्लेखोराला प्रतिकार केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडल्यामुळे प्रवासी व क्रू सदस्यांना हल्लेखोरावर नियंत्रण मिळवता आल्याचे नेत्यानाहू यांनी नमूद केले. त्यांच्या या कृतीमुळे इस्रायली नागरिकांसह विमानातील 174 प्रवाशांचे प्राण वाचल्याचे त्यांनी म्हटले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेचा उल्लेख करत कॅप्टन माछार यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. चाकूच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्यानंतरही त्यांनी मदतीसाठी कॉकपिटचा दरवाजा उघडल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. सह-वैमानिकाच्या हेतूबाबत बोलताना त्याने दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केला असावा किंवा तो मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती असावा, अशी शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली.
या घटनेत आणखी एका प्रवाशाच्या भूमिकेचीही चर्चा होत आहे. कॉकपिटचा दरवाजा उघडल्यानंतर त्याने आत प्रवेश करून हल्लेखोराला खाली पाडले. या प्रवाशाने विमानातील आपत्कालीन परिस्थितींबाबतच्या ‘Air Disasters’ या टीव्ही कार्यक्रमातून काही माहिती मिळाल्याचे सांगितल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.
कॅप्टन स्मित माछार हे भारतीय वंशाचे असून 2022 मध्ये ‘फ्लाय दुबई’मध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले होते. त्यापूर्वी त्यांनी सुमारे दहा वर्षे ‘स्पाइसजेट’मध्ये पायलट म्हणून काम केले आहे. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, घटनेनंतर फ्लाय दुबईने इस्रायलला जाणारी आणि तेथून येणारी आपली उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.


