मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बँक ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुकारण्यात आलेला बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा देशव्यापी संप अखेर मागे घेण्यात आला आहे. रविवारी रात्री इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारपासून बँकांचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे.
Bank strike deferred after the meeting between the Indian Banks' Association (IBA) and the United Forum of Bank Unions (UFBU) tonight. pic.twitter.com/SPJUwp63p2
— ANI (@ANI) September 27, 2026
रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः पाच दिवसांचा बँकिंग आठवडा, शनिवारची सुट्टी, स्केल-IV आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी Performance Linked Incentive (PLI) योजना तसेच ८ मार्च २०२४च्या बैठकीतील प्रलंबित मुद्दे यावर दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली.
पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्यावर समिती
बँक कर्मचाऱ्यांची महत्त्वाची मागणी असलेल्या पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याबाबत IBA आणि UFBUची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे ठरले आहे. ही समिती सर्व शनिवार सुट्टी करण्याच्या मागणीवर विविध पर्यायांचा विचार करणार आहे. बँक कर्मचारी, बँका आणि ग्राहकांची गैरसोय होणार नाही, अशा पर्यायावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मात्र, सर्व शनिवार सुट्टीचे करण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यासाठी पुढील चर्चा आणि समितीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
PLI योजनेत बदलाची शक्यता
स्केल-IV आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या Performance Linked Incentive (PLI) योजनेवरही बैठकीत चर्चा झाली. या योजनेबाबत बँक संघटनांनी काही आक्षेप नोंदवले आहेत. ते लक्षात घेऊन PLI योजनेत आवश्यक बदल करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी IBAच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले आहे.
८ मार्च २०२४च्या करारातील प्रश्नांवरही चर्चा
याशिवाय ८ मार्च २०२४च्या बैठकीच्या कार्यवृत्तातील प्रलंबित मुद्द्यांवरही चर्चा करून तोडगा काढण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे. या चर्चेनंतर UFBUने प्रस्तावित आंदोलन आणि तीन दिवसांचा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
ग्राहकांना मोठा दिलासा
संप झाला असता तर सलग तीन दिवस बँकांच्या शाखांमधील कामकाजावर परिणाम झाला असता. मात्र आता संप मागे घेतल्यामुळे सोमवारपासून बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे रोख व्यवहार, धनादेश, शाखेशी संबंधित कामे आणि इतर प्रत्यक्ष बँकिंग सेवांसाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, प्रस्तावित संपाच्या पार्श्वभूमीवर २७ सप्टेंबरच्या रविवारीही काही बँक शाखा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. सलग सुट्ट्या आणि संपामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती.
एकूणच, रविवारी रात्री झालेल्या चर्चेमुळे तीन दिवसांचा प्रस्तावित बँक संप टळला असला तरी पाच दिवसांचा बँकिंग आठवडा आणि PLI यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर अंतिम निर्णय झालेला नाही. आता या मागण्यांवर समिती आणि पुढील चर्चेतून काय तोडगा निघतो, याकडे बँक कर्मचारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.


