मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राम मंदिर (पूर्व) परिसरातील सार्वजनिक शौचालयातून रासायनिक वायूची गळती झाल्याने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृणालताई ब्रिजजवळ, पारसी पंचायत गेटसमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयात ही दुर्घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, शौचालयातून अचानक तीव्र रासायनिक वास येऊ लागला. या ठिकाणी गेलेल्या दोन तरुणांना गुदमरल्यासारखा त्रास होऊन त्यांची प्रकृती बिघडली.
घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अधिकारी तसेच पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य रासायनिक धोका लक्षात घेऊन परिसराची पाहणी करण्यात आली. दोन्ही तरुणांना तातडीने उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी पहाटे ३.४९ वाजता दोघांनाही मृत घोषित केले. मृतांची नावे प्रभाकर धनिवार (२४) आणि भाविन देसाई (१८) अशी आहेत.
दरम्यान, नेमक्या कोणत्या रसायनामुळे ही दुर्घटना घडली, ते रसायन सार्वजनिक शौचालयात कसे आले आणि दोन्ही तरुणांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाची तपासणी सुरू असून, पोलिसांकडूनही या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.


