सातारा प्रतिनिधी
सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून डीजे-डॉल्बी चालकांवर केलेल्या कारवाईवरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पोलिसांनी तब्बल १५ डीजेवर कारवाई करत साहित्य जप्त केल्यानंतर काही डॉल्बी चालक आणि मालकांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी डॉल्बी चालकांची बाजू घेत, अनेक जण रोजगाराच्या अभावामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. तसेच, डॉल्बीचे साहित्य जप्त करण्याची कारवाई योग्य नसल्याचे सांगत ते साहित्य सोडवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही या कारवाईबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. नियमांचे उल्लंघन झालेले नसताना कारवाई करण्यात आली असेल, तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने ध्वनीची मर्यादा निश्चित केली असून, ती तपासण्यासाठी आवश्यक यंत्रणा पोलिस प्रशासनाकडे आहे. या यंत्राद्वारे मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, नियमांचे उल्लंघन झालेले नसतानाही डॉल्बीवर कारवाई झाली असेल, तर विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडू द्यावी आणि त्यानंतर या कारवाईची सविस्तर चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली. त्यामुळे एका बाजूला पोलिसांची कारवाई, तर दुसऱ्या बाजूला डॉल्बी चालकांची बाजू घेणारे उदयनराजे आणि चौकशीचे आश्वासन देणारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे साताऱ्यातील डीजे-डॉल्बीचा मुद्दा चर्चेत आला आहे.


