स्वप्नील गाडे,गुन्हे वार्ताहर
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्गातील १५४ पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेतील प्रश्नसंच फुटीप्रकरणी विशेष तपास पथकाने आणखी चार जणांना अटक केली आहे. प्रश्नसंचाची गोपनीयता भंग करून आर्थिक फायद्यासाठी त्याची अनधिकृत देवाणघेवाण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी विविध कलमांनुसार कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या तपासात यापूर्वी अवर सचिव अभिजित लेंडवे, गोपनीय कक्षातील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रविण पाटील, मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश उर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गोपनीय कक्षातून तज्ज्ञांनी निवडलेल्या प्रश्नसंचाच्या प्रती तयार करून त्या गैरमार्गाने बाहेर काढण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे.
तपासादरम्यान गैरमार्गाने प्रश्नसंच मिळविल्याच्या आरोपावरून उमेदवार साजिद संदे याला सांगली आणि विजय किंगर याला बुलढाणा येथून अटक करण्यात आली. तसेच मध्यस्थ म्हणून भूमिका बजावल्याच्या आरोपावरून संदिप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांना नवी मुंबई येथून २४ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली. या चार अटकांनंतर प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या ११ झाली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय आणि पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण, गुन्हे शाखा राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त सदानंद राणे आणि प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.


