सुधाकर नाडर, मुंबई
मुंबई : मानखुर्दच्या मार्केट रोड परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन वर्षे चार महिन्यांच्या चिमुकल्याचा ४० तासांच्या अथक शोधानंतर मानखुर्द पोलिसांनी सुखरूप शोध घेतला. या प्रकरणी बालकाचे अपहरण करणाऱ्या मुस्कान भोलाकुमार साह आणि तिला मदत करणारा तिचा पती भोलाकुमार जग्गु साह या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बालकाला आरोपींच्या ताब्यातून सुखरूप बाहेर काढून कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.
२३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता कुटुंबीयांसोबत असताना चिमुकला अचानक बेपत्ता झाला. याबाबत मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर गु.र.क्र. ६२७/२०२६, कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मानखुर्द, देवनार, आरसीएफ आणि ट्रॉम्बे पोलीस ठाण्यांची आठ पथके तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना एक महिला बालकाला घेऊन जाताना दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या हालचाली, संभाव्य मार्ग, तांत्रिक माहिती आणि मानवी माहितीच्या आधारे विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली.
दिवस-रात्र सुरू असलेल्या तपासानंतर पोलिसांना बालक आणि त्याचे अपहरण करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यात यश आले. आरोपी मुस्कान भोलाकुमार साह आणि तिचा पती भोलाकुमार जग्गु साह, दोघेही महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथील रहिवासी असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची कार्यवाही सुरू आहे. बालक सुखरूप कुटुंबीयांच्या ताब्यात मिळाल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
या कारवाईत पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहायक पोलीस आयुक्त प्रमोद कोकाटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिलाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मानखुर्द पोलिसांच्या विविध अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


