कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आगामी निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, एकूण ३०० अर्जांपैकी ६० अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे २४० उमेदवारी अर्ज वैध राहिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
गोकुळच्या २५ संचालकपदांसाठी विविध प्रवर्गांतून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने छाननी प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संघाच्या उपविधीतील नियम आणि पात्रतेच्या निकषांनुसार अर्जांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काही संस्थांनी संघाच्या नियमांचे पालन न केल्याचे आढळल्याने संबंधित उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. अवैध अर्जदारांना त्याबाबत लेखी माहिती देण्यात आली आहे.
प्रवर्गनिहाय विचार करता, सर्वसाधारण गटातील १६२ अर्जांपैकी १४६ अर्ज वैध, तर १६ अर्ज अवैध ठरले. महिला प्रवर्गातील ६० अर्जांपैकी ३४ वैध आणि २६ अवैध ठरले. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील ४७ अर्जांपैकी ३७ वैध, तर १० अर्ज अवैध ठरले. अनुसूचित जाती प्रवर्गातील १३ अर्जांपैकी ९ वैध आणि ४ अवैध ठरले. तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील १८ अर्जांपैकी १४ अर्ज वैध आणि ४ अर्ज अवैध ठरले आहेत.
छाननीनंतर आता निवडणुकीतील पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वैध उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून, १९ ऑक्टोबर रोजी रमणमाळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी केली जाणार आहे.
मोठ्या संख्येने उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने आता माघारीच्या टप्प्यात उमेदवारांची संख्या कमी करण्याचे आव्हान संबंधित गटांसमोर राहणार आहे. २५ जागांसाठी २४० अर्ज वैध ठरल्याने निवडणूक प्रक्रिया पुढील काळात अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


