मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘राज्य महोत्सव गणेशोत्सव’ उपक्रमांतर्गत गणेशोत्सवावर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा देशपातळीवर अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हे विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीशी घट्ट जोडलेल्या गणेशोत्सवातील भक्ती, कला, सामाजिक सहभाग आणि सार्वजनिक उत्सवाची परंपरा या माध्यमातून व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व नवतंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष बाजीराव शेलार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत संगीता कैलास खेडेकर आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र किसन जयभाये यांचीही उपस्थिती राहणार आहे.
विशेष टपाल तिकिटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची परंपरा, सार्वजनिक सहभाग आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. टपाल तिकिटांच्या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची नोंद केली जाते. त्यामुळे गणेशोत्सवाला समर्पित हे तिकीट महाराष्ट्राच्या उत्सवपरंपरेचे दस्तऐवजीकरण करणारे ठरणार आहे.
‘राज्य महोत्सव गणेशोत्सव’ अंतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नागरिकांना स्नेह निमंत्रण देण्यात आले असून प्रवेश विनामूल्य आहे.


