
मुंबई प्रतिनिधी
राज्यात नवीन सरकार येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होणं हे आता सामान्य झालं आहे. त्याप्रमाणेच आता महायुती सरकार स्थापन होताच पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाला आहे.
कारण नुकतंच सरकारकडून 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
मात्र, यामध्ये IAS राहुल कर्डिले यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण महिनाभरापू्र्वीच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेल्या कर्डिले यांच्याकडे आता पुन्हा नांदेडचे जिल्हाधिकारी पदाचा कारभार देण्यात आला आहे
महिन्याभरातच तीन वेळा बदली झाल्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यानंतर आता राहुल कर्डिले हे अधिकारी सरकारच्या ‘टार्गेट’वर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगरचे असून 2015 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग परभणीमध्ये होती. ट्रेनी आयएएस म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आलं होतं.
त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. नंतरच्या काळात त्यांची MMRDA च्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर नुकतंच महिनाभरापू्र्वी त्यांची सिडकोच्या (CIDCO) सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे नांदेडच्या जिल्हाधिकारीपदाचा कारभार देण्यात आला आहे.
प्रवीण दराडे, पंकज कुमार, नितीन पाटील, श्वेता सिंघल, डॉ. प्रशांत नारनवरे, अनिल भंडारी, पी.के. डांगे, एस. रामामूर्ती, अभिजित राऊत, मिलिंद कुमार साळवे, राहुल कर्डिले, माधवी सरदेशमुख, अमित रंजना यांचा समावेश आहे.