मुंबई प्रतिनिधी
म्हाडा ही केवळ घरे बांधणारी संस्था नसून लाखो सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील गृहनिर्माणाचा पाया मजबूत करणारी अग्रगण्य संस्था आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्ये, संवेदनशीलता आणि बांधकामातील गुणवत्ता यांची जपणूक करणे आवश्यक आहे. भविष्यातील अभियंता हा केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणणारा नव्हे, तर त्या तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी करणारा संवेदनशील अभियंता असावा, असे प्रतिपादन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे येथील सभागृहात आयोजित ‘अभियंता दिन-२०२६’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अभियंत्यांसमोरील नवी आव्हाने
गृहनिर्माण क्षेत्रात वेगाने बदल होत असून वाढती लोकसंख्या, शहरीकरण, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, उपलब्ध जमिनीची मर्यादा आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आगामी सात ते आठ वर्षे म्हाडासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक असतील. आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण विचार आणि संवेदनशीलता यांचा समन्वय साधत अभियंत्यांनी कार्यपद्धतीत आवश्यक बदल स्वीकारावेत, असे आवाहन जयस्वाल यांनी केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पण माणुसकी कायम
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहितीचे विश्लेषण आणि निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकते. मात्र, मानवी भावना, अनुभव, संवेदना आणि सहानुभूतीची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना नागरिकांच्या गरजा आणि मानवी मूल्ये केंद्रस्थानी ठेवली पाहिजेत, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
गुणवत्ता, वेग आणि अचूकतेवर भर
म्हाडाचे मुख्य अभियंता महेश जेसवानी यांनी अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांना शुभेच्छा देत विश्वेश्वरय्या यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. मुख्य अभियंता अनिल अंकलगी यांनी गुणवत्तापूर्ण काम, वेग आणि अचूकता ही अभियंत्यांच्या कार्यपद्धतीची मूलभूत तत्त्वे असल्याचे सांगितले. सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास संस्थेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना
मुख्य अभियंता-१ धीरजकुमार पंदिरकर यांनी म्हाडाच्या बांधकाम पद्धतीत काळानुरूप मोठे बदल झाल्याचे सांगितले. आधुनिक प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा गृहनिर्माण क्षेत्रात प्रभावी वापर केल्यास बांधकामाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढविता येईल. त्यातून लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि मूल्यवर्धित घरे उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
पदोन्नती झालेल्या अभियंत्यांचा गौरव
अभियंता दिनाच्या कार्यक्रमात पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता राकेश गावित यांनी केले. म्हाडाच्या आगामी गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्पांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासोबत गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

