बारामती प्रतिनिधी
दौंड आणि बारामती तालुक्यांना जोडणाऱ्या चौफुला-सुपे मार्गावर आज बुधवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील ३० ते ४० विद्यार्थी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने दखल घेतली असून, जखमी विद्यार्थ्यांना योग्य आणि तातडीचे वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची ST बस सुपे घाटात कोसळल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि एसटी महामंडळाच्या सेवेबाबत चिंता वाटावी अशी आहे. काही विद्यार्थ्यांना लागलेला थोडा-मार वगळता नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याच्या जिवीतास धोका झाला नाही, हे सर्वजण… pic.twitter.com/ToX4x8yVrv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 16, 2026
विद्यार्थी नेहमीप्रमाणे एसटी बसने शाळेकडे जात असताना चौफुला-सुपे मार्गावर हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने पाटस, चौफुला आणि लोणी काळभोर येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आणि विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच घटनास्थळी आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पालकांनी आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

