मुंबई प्रतिनिधी
मुंबई : कोट्यवधींची संपत्ती, आमदारकी आणि राजकीय प्रतिष्ठा बाजूला ठेवत घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शहा यांनी चक्क भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर बसून नागरिकांकडून मदत मागण्याचा अनोखा प्रयोग केला. शहा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शहा यांनी ३,३८३ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्या या प्रयोगाची विशेष चर्चा होत आहे.
🙏 पवित्र पर्युषण पर्व पर एक प्रेरणादायी अनुभव 🙏
परम पूज्य राष्ट्रसंत श्री नम्रमुनि महाराज साहेब ने अपने प्रवचन में समाज के जरूरतमंद लोगों के प्रति संवेदनशीलता, करुणा और मानवता का संदेश दिया।
गुरुदेव की आज्ञा का पालन करते हुए वेशभूषा बदलकर घाटकोपर रेलवे स्टेशन परिसर में आम… pic.twitter.com/mFL2cWWfne
— Parag Shah (@ParagShahBJP) September 14, 2026
पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर जैन धर्मगुरू राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन हा प्रयोग केल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. आपली ओळख, पद, पैसा आणि प्रतिष्ठा काही काळ बाजूला ठेवून समाजातील गरजू व्यक्तीचे जीवन प्रत्यक्ष अनुभवण्याचा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
शहा यांनी मेकअप आणि वेशभूषेच्या माध्यमातून आपला चेहरामोहरा पूर्णपणे बदलला. साधे, जीर्ण कपडे परिधान करून ते घाटकोपर परिसरातील रस्त्यावर बसले. काही नागरिकांनी त्यांना मदत केली, तर काहींनी दुर्लक्ष केले. एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने त्यांना समोसा दिल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, आपल्या मतदारसंघातील अनेक नागरिकांनी या वेषातील शहांना ओळखले नाही.
पद आणि ओळख नसताना समाजाचा एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा या प्रयोगाचा उद्देश होता. गरिबी ही केवळ आर्थिक परिस्थिती नसून त्यासोबत सामाजिक उपेक्षा आणि माणुसकीची परीक्षा देखील असते, हा संदेश या प्रयोगातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शहा यांच्या या कृतीवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा संवेदनशील सामाजिक प्रयोग असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी त्याला प्रसिद्धीचा प्रयत्न ठरवले आहे. मात्र, ‘३,३८३ कोटींची संपत्ती असलेला आमदार काही काळ भिकाऱ्याच्या भूमिकेत का गेला?’ हा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शहा यांच्या म्हणण्यानुसार, यामागे राजकारण नसून गुरूंची शिकवण, आत्मपरीक्षण आणि गरजू माणसाचे जगणे समजून घेण्याचा प्रयत्न आहे.

