मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दिवंगत दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेता सूरज पांचोली आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचीही नावे असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राऊत यांनी या प्रकरणाबाबत बोलताना आतापर्यंत आपण जाणीवपूर्वक मौन बाळगल्याचे सांगितले. दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, त्यामध्ये एका तरुणीच्या चारित्र्याचा तसेच तिच्या कुटुंबावर झालेल्या गंभीर आघाताचा प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.
या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी यापूर्वी अनेक वेळा तपास केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासाच्या निष्पक्षतेवर शंका घेण्याचे कारण नसल्याचेही राऊत यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना नव्हे, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतानाच या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला.
तपासानंतर पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. त्या तपासात आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन प्रकरणाशी कोणताही संबंध आढळला नसल्याचे राऊत यांनी सांगितले. विरोधकांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगानेही पोलिसांनी तपास केला होता, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, दिशा सालियन यांच्या वडिलांनी एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह इतर व्यक्तींची नावे असल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला पुन्हा राजकीय वळण मिळाले आहे. त्यामुळे आता नव्याने दाखल झालेल्या एफआयआरमध्ये नेमके आरोप काय आहेत आणि त्याचा तपास कोणत्या दिशेने होणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

