मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल नऊ फूट लांबीचा भारतीय अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. नागरिकांनी साप आल्याची माहिती दिल्यानंतर सर्पमित्र विकी दुबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
रविवार, १३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास खेरवाडी परिसरात साप आल्याची माहिती सर्पमित्र विकी दुबे यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. यावेळी परिसरात भारतीय अजगर जातीचा सुमारे नऊ फूट लांबीचा अजगर आढळून आला.
अजगर मोठ्या आकाराचा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्र विकी दुबे यांनी योग्य खबरदारी घेत अजगराला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर अजगराला सुरक्षित ठिकाणी नेऊन त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली.
दरम्यान, याच काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था कार्यरत होती. या सुरक्षाव्यवस्थेदरम्यान खेरवाडी परिसरात अजगर आढळल्याने नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. सर्पमित्राच्या तत्परतेमुळे अजगराला सुरक्षितपणे पकडून त्याचे प्राण वाचविण्यात आले.

