नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये रविवारी UPSCच्या सीडीएस (II) आणि एनडीए व एनए (II) परीक्षेदरम्यान प्रवेशावरून गोंधळ निर्माण झाला. केव्हीएन नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर काही सेकंदांपासून दोन-तीन मिनिटे उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा आरोप पालक आणि विद्यार्थ्यांनी केला. शहरातील खड्डे, रस्त्यांचे खोदकाम आणि वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
“केवळ १० सेकंद उशिरामुळे आमचा शेवटचा प्रयत्न आणि वर्षभराची मेहनत वाया जात आहे. आम्ही काय गुंड आहोत का?” असा संतप्त सवाल करत विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर आक्रोश केला. काही पालकांनी इतर केंद्रांवर उशिरापर्यंत प्रवेश दिला जात असल्याचा दावा करत नाशिकमधील केंद्राच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
मात्र, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळले. UPSCच्या नियमांनुसार प्रवेशाची वेळ निश्चित असते आणि गेट बंद झाल्यानंतर स्थानिक प्रशासन हस्तक्षेप करू शकत नाही. वेळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, परीक्षा केंद्राजवळ सार्वजनिक काम सुरू असल्याचे आढळले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिकमध्ये या परीक्षेला ४ हजार ३७५ उमेदवारांपैकी ३ हजार ११३ उमेदवार उपस्थित राहिले. एकूण उपस्थितीचे प्रमाण ७१.१५ टक्के नोंदवण्यात आले. प्रवेश नाकारल्याच्या आरोपामुळे मात्र UPSCच्या कडक वेळेच्या नियमांसोबतच शहरातील वाहतूक आणि रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दाही चर्चेत आला आहे.

