मुंबई प्रतिनिधी
वांद्रे येथील एमआयजी क्लबवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईचा परिणाम कायम असून, अन्न व्यवसायाचा परवाना स्थगित झाल्याने क्लबमधील उपाहारगृहे गेल्या सुमारे ४५ दिवसांपासून बंद आहेत. वैध एफएसएसएआय परवान्याशिवाय कॅटरिंग व्यवसाय सुरू असल्यासह स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्नाची अयोग्य साठवणूक आणि हाताळणी यांसह अनेक गंभीर त्रुटी तपासणीत आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
एमआयजी क्लबच्या परिसरापासून काही अंतरावरच एफडीएचे कार्यालय असल्याने या क्लबमध्ये विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्वागत, निरोप समारंभ तसेच विविध कार्यक्रम सातत्याने होत असत. त्यामुळे क्लबला एफडीए अधिकाऱांकडून अनुकूलता मिळत असल्याची चर्चा होती. मात्र आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईमुळे या कथित ‘शिष्टाई’ला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.
एफडीएच्या तपासणीत क्लबच्या किचनमध्ये जिवंत झुरळे, कोळ्याची जाळी, कच्चे व शिजवलेले तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची अयोग्य पद्धतीने हाताळणी व साठवणूक आढळली. अन्न आणि पाण्याची नियतकालिक तपासणी न करणे, पात्र तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनिवार्य आरोग्य नोंदी उपलब्ध नसणे, अशा त्रुटीही निदर्शनास आल्या. याशिवाय प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता काही संरचनात्मक व व्यवस्थापकीय बदल करण्यात आल्याचेही तपासणीत समोर आले.
विशेष म्हणजे, या क्लबला यापूर्वी २०१६, २०१९ आणि २०२३ मध्येही त्रुटींबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर फारसा कठोर पाठपुरावा न झाल्याने काही त्रुटी दूर करून क्लबचे कामकाज पुन्हा सुरू होत राहिले. यावेळी मात्र एफडीएने कठोर भूमिका घेतल्याने क्लबला प्रथमच एवढ्या प्रदीर्घ काळासाठी उपाहारगृहे बंद ठेवावी लागली आहे.
क्लबचा अन्न व्यवसाय परवाना २८ जुलै रोजी स्थगित करण्यात आला होता. एफडीएने निर्देशित केलेल्या त्रुटी दूर केल्यानंतर क्लबने गेल्या आठवड्यात पूर्तता अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांकडून क्लबची नव्याने तपासणी होणार असून, सर्व नियमांची पूर्तता झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच परवाना स्थगिती उठविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
“क्लबने पूर्तता अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पुन्हा तपासणी करून क्लबच्या परवान्याबाबत निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त पी. एस. सिंगरवार यांनी दिली.
दरम्यान, क्लबला एफएसएसएआयचा आवश्यक परवाना न घेताच कॅटरिंग व्यवसाय सुरू ठेवता येत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने एफडीएच्या पूर्वीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र आता नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने क्लबला आवश्यक परवाने घेऊनच खाद्यव्यवसाय सुरू करावा लागणार आहे. त्यामुळे मुंडे यांच्या कारवाईमुळे केवळ क्लबचे कामकाज ठप्प झाले नसून, अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थापनांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.

