मुंबई प्रतिनिधी
गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आणि पश्चिम उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गणेशोत्सवाच्या तयारीला काहीसे विघ्न आले. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी सकाळपर्यंत अनेक भागांत दमदार हजेरी लावली. मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले असून, नालासोपारा, कुर्ला परिसरासह विविध ठिकाणी नागरिकांना पावसाचा फटका बसला.
गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा साहित्य, फुले, फळे आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची गर्दी झाली होती. मात्र, पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि बाजार परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फुलमार्केट आणि बाजारपेठेत पाणी साचल्याने गणेशभक्तांसह विक्रेत्यांचीही धावपळ उडाली. फुले, फळे आणि सजावटीच्या साहित्याचे नुकसान होण्याची भीती विक्रेत्यांनी व्यक्त केली. नालासोपारा परिसरातील पाणी साचल्याने रेल्वे प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागला.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे, अंधेरीसह घाटकोपर आणि मुलुंड परिसरातही काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे. मुंबईत काही भागांत सकाळीच १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पावसातून वाट काढावी लागली.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही पावसाच्या सरी सुरू असून, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वाढली आहे. नवी मुंबईत गणेशोत्सवासाठी खरेदी तसेच मूर्ती आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत असताना पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई-ठाणे आणि परिसरासाठी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वसई-विरार आणि पालघर पट्ट्यातही पावसाने जोर धरला आहे. वसई-विरारमधील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः नालासोपारा परिसरात पाणी साचल्याने गणेशोत्सवाच्या तयारीवर परिणाम झाला. गणेशमूर्ती आणि सजावटीचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे.
दरम्यान, पावसामुळे नालासोपारा येथे गणेशमूर्ती झाकण्याच्या प्रयत्नात मूर्ती कलंडल्याची घटनाही घडली. यामध्ये चार ते पाच भाविक मूर्तीखाली अडकले; मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली असून मोठी दुर्घटना टळली.
हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज, तर आसपासच्या काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. जोरदार पावसासोबत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी पावसाची स्थिती लक्षात घेऊनच घराबाहेर पडावे, तसेच गणेशमूर्ती आणि सजावटीचे साहित्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई आणि उपनगरांतील गणेश मंडळे सज्ज झाली असतानाच पावसाने अचानक जोर धरल्याने उत्साहावर काहीसा विरजण पडले आहे. मात्र पावसाचा जोर कमी होताच बाजारपेठांमध्ये पुन्हा खरेदीसाठी गर्दी वाढण्याची शक्यता असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरूच आहे.

