जालना प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, शुक्रवारी त्यांच्या उपोषणाचा १४वा दिवस आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेऊन प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी विनंती केली.
गेल्या १४ दिवसांपासून उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे पाटील साहेबांची आज भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेऊन आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी मनापासून विनंती केली.
जर सरकारने ग्रामीण भागातील तरुणांना… pic.twitter.com/6DPRouDRcr
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) September 11, 2026
अभिजीत दिपके म्हणाले, मराठा समाजातील मुलांना चांगले शिक्षण आणि रोजगार मिळावा, यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून दिल्या असत्या, तर त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आली नसती. लोकांची कामे करण्यासाठी सरकारला निवडून दिले आहे; मात्र सरकारने लोकांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका त्यांनी केली.
आत्महत्या केलेल्या प्रथमेश देशमुख यांच्या कुटुंबीयांची आपण भेट घेतली. केवळ अडीच लाख रुपयांच्या उधारीमुळे २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. अशा तरुणांना रोजगार आणि सवलती मिळाव्यात, यासाठीच जरांगे पाटील लढा देत आहेत, असे दिपके यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला १४ दिवस झाले आहेत. सरकारने अंतरवाली सराटी येथे येऊन त्यांच्याशी चर्चा करण्यास काय हरकत आहे? असा सवालही दिपके यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शहरांमध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध असल्या तरी ग्रामीण भागातील अनेक मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे सरकारने ग्रामीण तरुणांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेऊन आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी विनंती दिपके यांनी केली. दरम्यान, सरकारने ग्रामीण भागातील तरुणांना चांगले शिक्षण व रोजगाराच्या संधी दिल्या असत्या, तर जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाची वेळ आली नसती. त्यांच्या आंदोलनातून लोकांचा सरकारवरील विश्वास कमी झाल्याचे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केली.

