मुंबई प्रतिनिधी
मुंबई : तिकीट नसलेल्या प्रवाशाला दंड भरण्यास सांगितल्याने संतापलेल्या प्रवाशाने तिकीट तपासनीसाला ठोसा मारल्याची घटना बुधवारी जोगेश्वरी रेल्वे स्थानकात घडली. या मारहाणीत टीसीचा चष्मा फुटून उजव्या डोळ्याखाली दुखापत झाली असून त्यांना सात टाके घालण्यात आले.
पश्चिम रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत असलेले आशीष रंजन गुप्ता हे बुधवारी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत जोगेश्वरी स्थानकात तिकीट तपासणीचे काम करत होते. सायंकाळी सुमारे ४.५५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३/४ च्या चर्चगेट दिशेकडील जिन्याजवळील पुलावर ते प्रवाशांची तिकिटे तपासत होते. त्यावेळी अजय शिवकुमार धिवर याच्याकडे तिकीट नसल्याचे आढळून आले.
तिकीट नसल्याने गुप्ता यांनी धिवर याला ५१० रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. मात्र, त्याने दंड भरण्यास नकार देत गुप्ता यांच्या हाताला झटका देऊन तेथून पळण्याचा प्रयत्न केला. गुप्ता यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता धिवर याने त्यांच्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारला. या हल्ल्यात त्यांचा चष्मा फुटला आणि उजव्या डोळ्याखाली दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी जखमेवर सात टाके घातले. या प्रकरणी संबंधित प्रवाशाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

