मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षाव्यवस्थेत मोठी खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. कार्यक्रमाच्या परिसरातून मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी एका तरुणाकडे पंतप्रधान कार्यालयाचा बनावट ओळखपत्र आढळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, त्याच्यासोबत असलेल्या खासगी बॉडीगार्डकडे बंदूक आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पारेख (२४) हा तरुण एनएमएसीसी परिसरात संशयास्पदरीत्या वावरताना सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास आला. तो स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याच्याकडे असलेले ओळखपत्र तपासण्यात आल्यानंतर ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
रोहन पारेख एकटाच कार्यक्रमस्थळी आला नव्हता. त्याच्यासोबत खासगी बॉडीगार्ड असल्याचे तपासात समोर आले. या बॉडीगार्डकडे बंदूक आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली. पंतप्रधानांच्या व्हीव्हीआयपी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बनावट ओळखपत्राच्या आधारे एक तरुण कार्यक्रमस्थळी पोहोचणे आणि त्याच्यासोबत बंदुकधारी व्यक्ती असणे, ही बाब गंभीर मानली जात आहे.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पारेखने बनावट ओळखपत्र कशासाठी तयार केले, ते कुठून मिळवले आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

