मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तासमीकरण स्थिरावले असतानाच आता ठाकरे गटाच्या नगरसेवकांभोवती कायदेशीर संकट अधिक गडद झाले आहे. माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद अखेर रद्द झाले आहे. ७ सप्टेंबर रोजी महापौर रितू तावडे यांनी सभागृहात याची अधिकृत घोषणा केली.
विशाखा राऊत यांच्या प्रकरणानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी १६ नगरसेवकांच्या विजयाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये शिंदे गटाच्या पराभूत उमेदवारांकडूनच निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. जात प्रमाणपत्र, निवडणूक अर्जातील माहिती, संपत्तीचे विवरण, शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी प्रकरणे तसेच मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित गंभीर आक्षेप या याचिकांमध्ये घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित नगरसेवक दोषी ठरले आहेत किंवा त्यांचे पद रद्द होणार आहे, असा निष्कर्ष सध्या काढता येणार नाही. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या आरोपांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.
विशाखा राऊत यांचे नेमके काय झाले?
दादरमधील प्रभाग क्रमांक १९१ हा मागासवर्गीय महिलेसाठी राखीव होता. विशाखा राऊत यांनी या जागेवरून निवडणूक लढविताना कुणबी जात प्रमाणपत्र सादर केले होते. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. समितीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधून संबंधित कुणबी प्रमाणपत्रधारकांशी त्यांचे रक्ताचे नाते पुराव्यांद्वारे सिद्ध झाले नाही.
या निर्णयाविरोधात राऊत यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला नाही. त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची अधिसूचना काढली आणि पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्रतेची कारवाईही करण्यात आली.
त्यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवक संख्येला एक धक्का बसला आहे. त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडेही लक्ष लागले आहे.
विशाखा राऊत यांच्या आधी दीपक सावंत यांचे पद गेले
विशाखा राऊत यांच्या आधी प्रभाग क्रमांक १११ मधून निवडून आलेले ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांचे पदही जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात रद्द झाले होते. याशिवाय मुंबई महापालिकेत जात प्रमाणपत्राशी संबंधित कारणांमुळे अन्य पक्षांच्या नगरसेवकांवरही अपात्रतेची कारवाई झाल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे आता नव्या महापालिका सभागृहात निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडणुकीवर दाखल झालेल्या याचिकांकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे.
ठाकरे गटाचे १६ नगरसेवक आणि त्यांना आव्हान देणारे शिंदे गटाचे प्रतिस्पर्धी
१. प्रभाग क्रमांक १२१ – प्रियदर्शिनी ठाकरे (ठाकरे गट) – आव्हान : प्रतिमा शैलेश खोपडे (शिंदे गट)
२. प्रभाग क्रमांक ६२ – झिशान मुल्तानी (ठाकरे गट) – आव्हान : राजू पेडणेकर (शिंदे गट)
३. प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे (ठाकरे गट) – आव्हान : सुमित वाजळे (शिंदे गट)
४. प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे (ठाकरे गट) -आव्हान : सुवर्णा गावस (शिंदे गट)
५. प्रभाग क्रमांक ७३ – लोना रावत (ठाकरे गट) – आव्हान : दीप्ती पोतनीस (शिंदे गट)
६. प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे (ठाकरे गट) – आव्हान : राजराजेश्वरी रेडकर (शिंदे गट)
७. प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ (ठाकरे गट) – आव्हान : संजय (नाना) आंबोले (शिंदे गट)
८. प्रभाग क्रमांक २०३ – भारती पेडणेकर (ठाकरे गट) – आव्हान : समिधा भोळेकर (शिंदे गट)
९. प्रभाग क्रमांक ७७ – शिवानी परब (ठाकरे गट) – आव्हान : प्रियांका आंबोलकर (शिंदे गट)
१०. प्रभाग क्रमांक ८९ – गीतेश राऊत (ठाकरे गट) – आव्हान : राजेश नाईक (शिंदे गट)
११. प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे (ठाकरे गट) – आव्हान : विजय लिपारे (शिंदे गट)
१२. प्रभाग क्रमांक १९८ – अबोली खाड्ये (ठाकरे गट) – आव्हान : वंदना गवळी (शिंदे गट)
१३. प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर (ठाकरे गट) – आव्हान : मानसी पाटील (शिंदे गट)
१४. प्रभाग क्रमांक ९४ – प्रज्ञा भुतकर (ठाकरे गट) – आव्हान : पल्लवी पै (शिंदे गट)
१५. प्रभाग क्रमांक ५३ – जितेंद्र वाळवी (ठाकरे गट) – आव्हान : अशोक खंडवे (शिंदे गट)
१६. प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी (ठाकरे गट) – आव्हान : शेख वकील सागीर अहमद (शिंदे गट)
आरोप सिद्ध झाले तर काय होणार?
या याचिका सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने केवळ याचिका दाखल झाल्यामुळे नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होत नाही. संबंधित उमेदवारांविरोधातील आरोप न्यायालयात सिद्ध होणे आणि त्यानंतर न्यायालयीन आदेश होणे आवश्यक आहे.
मात्र, विशाखा राऊत यांच्या प्रकरणाने या याचिकांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. एका वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेविकेचे पद जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर गेल्यानंतर आता इतर नगरसेवकांच्या निवडणूक कागदपत्रांची आणि पात्रतेचीही छाननी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटासाठी नवा राजकीय पेच
मुंबई महापालिकेतील ठाकरे गट आधीच सत्तेबाहेर आहे. अशा परिस्थितीत नगरसेवकांची संख्या कमी होणे किंवा आणखी काही जागांवर कायदेशीर प्रश्न निर्माण होणे हे पक्षासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकते.
विशाखा राऊत यांचे पद रद्द झाल्यानंतर त्यांच्या प्रभागात शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर या दुसऱ्या क्रमांकावर असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रियेत त्यांचे नाव चर्चेत आले आहे.
त्यामुळे आता प्रश्न केवळ १६ नगरसेवकांच्या पदांचा नाही, तर या याचिकांचा निकाल लागल्यानंतर मुंबई महापालिकेतील पक्षीय संख्याबळ आणि राजकीय समीकरणांवर त्याचा किती परिणाम होतो, हा आहे.
विशाखा राऊत यांच्यापासून सुरू झालेली ही कायदेशीर मालिका आता आणखी किती नगरसेवकांपर्यंत पोहोचते आणि न्यायालय या याचिकांवर काय निर्णय देते, याकडे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

