ठाणे प्रतिनिधी
दहीहंडीच्या उंचच उंच थरांचा थरार, गोविंदा पथकांचा उत्साह आणि हंडी फोडल्यानंतर होणारा जल्लोष यामुळे हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या उत्साहाला सुरक्षिततेची जोड नसेल तर एका क्षणातील चूक आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते. भिवंडीतील नागेश भोईर यांचे आयुष्य याचेच विदारक उदाहरण आहे. २००९ मध्ये वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी दहीहंडीच्या थरावरून पडल्याने त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्या अपघातानंतर गेली १८ वर्षे त्यांचे आयुष्य अंथरुणापुरते मर्यादित झाले आहे.
आजही नागेश यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. औषधोपचार, फिजिओथेरपी आणि वेळोवेळी रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च कुटुंबासाठी मोठे आर्थिक आव्हान बनला आहे. त्यामुळे ‘मला थेट आर्थिक मदत नको. मी ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो, त्या उपचारांचा खर्च शासनाने उचलावा,’ अशी मागणी नागेश यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
एका अपघाताने बदलले आयुष्य
दहीहंडीच्या थरावर चढताना नागेश खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू झाले; मात्र दुखापतीचे परिणाम कायमस्वरूपी ठरले. स्वतःच्या पायावर उभे राहणे, काम करणे आणि सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगणे, ही स्वप्ने त्या एका अपघातानंतर हिरावली गेली.
अपघाताच्या वेळी नागेश अवघे २४ वर्षांचे होते. तरुण वयात झालेल्या या दुर्घटनेनंतर त्यांच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल झाला. गेली १८ वर्षे त्यांना अंथरुणावरच राहावे लागत आहे. नियमित वैद्यकीय उपचार, औषधे आणि फिजिओथेरपीची आवश्यकता असते. प्रकृतीनुसार साधारण दोन महिन्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
मित्रांची मदतही अपुरी
अपघातानंतर सुरुवातीच्या काळात मित्र, परिचित आणि नातेवाईकांनी उपचारांसाठी मदतीचा हात दिला. मात्र, दीर्घकाळ सुरू असलेल्या उपचारांमुळे ही मदत हळूहळू कमी होत गेली. सध्या काही मोजके मित्र औषधोपचारासाठी मदत करीत आहेत. परंतु दीर्घकालीन उपचारांचा खर्च भागविणे कुटुंबासाठी दिवसेंदिवस कठीण होत आहे.
‘माझ्या उपचारांसाठी मला आर्थिक मदत देण्यापेक्षा मी ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो, त्या उपचारांचा खर्च शासनाने थेट उचलावा. माझ्यावर आयुष्यभर उपचार सुरू राहणार आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत कायमस्वरूपी मदतीची व्यवस्था करावी,’ अशी अपेक्षा नागेश यांनी व्यक्त केली आहे.
‘पैशांसाठी जीव धोक्यात घालू नका’
आपल्या अनुभवातून नागेश यांनी दहीहंडी खेळणाऱ्या तरुणांनाही सावध केले आहे. दहीहंडीच्या थरांची उंची वाढवून केवळ स्पर्धेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करू नका, असे ते सांगतात.
‘गोविंदांनी स्पर्धा करू नये. पाच-सहा थर लावून आनंदाने दहीहंडी साजरी करावी. पैशांसाठी जीव धोक्यात घालू नका. आज स्पर्धेत बक्षीस मिळेल; पण त्यानंतर काही दुर्घटना घडली तर त्रास सहन करणाऱ्या व्यक्तीकडे पाहायला कोणी येत नाही,’ असा संदेश नागेश यांनी गोविंदा पथकांना दिला आहे.
उंच थरांसोबत वाढते अपघाताचे धोके
दहीहंडीच्या उत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलले आहे. मानवी मनोऱ्यांची उंची, विविध गोविंदा पथकांमधील स्पर्धा आणि मोठ्या बक्षिसांच्या घोषणा यामुळे थरांचा थरार वाढला आहे. मात्र, त्याचबरोबर अपघाताचा धोकाही वाढतो.
उंच थरावरून पडल्यास मणका, डोके, मान तसेच हात-पायांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. काही दुर्घटनांमध्ये कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे दहीहंडीचा उत्साह कायम ठेवतानाच सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज नागेश यांच्या घटनेतून अधोरेखित होते.
वृद्ध आई-वडिलांवर देखभालीची जबाबदारी
नागेश यांच्या उपचारांची आणि दैनंदिन देखभालीची जबाबदारी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांवर आहे. वडील खासगी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घरी कायमस्वरूपी परिचारिका किंवा डॉक्टर ठेवणे कुटुंबाला शक्य होत नाही.
‘आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही घरी परिचारिका किंवा डॉक्टर ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी जे काही करायचे आहे ते आम्हालाच करावे लागते. त्याचे वडील आणि मी त्याच्यासाठी झिजत आहोत. तो ज्या वेळी, ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईल, त्या उपचारांचा खर्च शासनाने उचलावा. एवढीच आमची मागणी आहे,’ अशी व्यथा नागेश यांच्या आईने व्यक्त केली.
दहीहंडीच्या एका अपघाताने तरुण वयातील नागेश यांचे आयुष्यच बदलले. आता उर्वरित आयुष्यासाठी सुरू असलेल्या उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, हीच त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा आहे. दहीहंडीच्या उत्सवात थरारापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरजही या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.

