ठाणे प्रतिनिधी
ठाणे : कळवा येथील खारीगाव परिसरातील एका सोसायटीच्या आवारात चारचाकी वाहनाने नागरिकांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण चारचाकी वाहन चालवत होता. सोसायटीच्या आवारातून महामार्गाच्या दिशेने जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने परिसरातील नागरिकांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या अन्य दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे. वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, तसेच अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग किती होता, याची माहिती तपासातून समोर येणार आहे. या घटनेमुळे खारीगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

