सातारा प्रतिनिधी
सातारा : येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीने तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सृष्टी भानुदास बिरामणे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती फूड अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. या घटनेने महाविद्यालय परिसरासह वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वसतिगृहातील वॉशरूममध्ये काही आक्षेपार्ह शब्द लिहिल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना महाविद्यालय प्रशासनाकडून बोलावण्यात येणार असल्याची चर्चा वसतिगृहात सुरू होती. या चर्चेमुळे सृष्टी मानसिकदृष्ट्या त्रस्त आणि भयभीत झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केवळ पालकांना बोलावण्याच्या चर्चेमुळेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले की त्यामागे अन्य काही कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळावरून चिठ्ठी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत नेमके काय नमूद आहे, तसेच त्यातून सृष्टीच्या आत्महत्येच्या कारणाबाबत काही माहिती मिळते का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. सृष्टी कोणत्या मानसिक दबावाखाली होती, याचाही तपास केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आवश्यक कारवाई करून तपास सुरू केला असून, महाविद्यालय प्रशासन, वसतिगृह व्यवस्थापन तसेच विद्यार्थिनींकडून माहिती घेतली जात आहे. सृष्टीच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.

