सातारा प्रतिनिधी
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या साताऱ्याच्या कास पठारावर बहुप्रतीक्षित फुलोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. पावसाळ्यानंतर पठारावर उमलणाऱ्या असंख्य रानफुलांचा बहर पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक कासकडे धाव घेतात. यंदाही चवर, तेरडा, सीतेचे आसवे, गेंद, नभाळी, आभाळी कंदील पुष्प आणि कुमुदिनी यांसह विविध रंगांची फुले उमलू लागल्याने कास पठाराचे रूप अधिकच खुलले आहे.
फुलांचा हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची वाढणारी गर्दी आणि त्यातून होणारे पर्यावरणीय नुकसान लक्षात घेऊन कास वन समितीने प्रवेशावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात दररोज केवळ तीन हजार पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार आहे. विशेषतः शनिवार, रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या दिवशी केवळ ऑनलाइन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. थेट पठारावर येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही.
ऑनलाइन बुकिंग आवश्यक
कास पठाराला भेट देण्यासाठी पर्यटकांना ****. १२ वर्षांवरील पर्यटकांसाठी प्रवेशशुल्क २०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये पार्किंगच्या ठिकाणाहून कास पठारापर्यंत बससेवेचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटकांनी स्वतःची वाहने पठारावर नेण्याऐवजी निर्धारित पार्किंग व्यवस्था आणि बससेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय पर्यटकांना एकीव आणि कुमुदिनी टेहळणी मनोऱ्यावरून परिसरातील निसर्गसौंदर्याचा विहंगम अनुभव घेता येणार आहे. कास परिसरातील जैवविविधता आणि नैसर्गिक संपदा अनुभवण्यासाठी यंदा विविध सुविधांवरही भर देण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या अधिकृत उद्घाटन
कास पठार हंगाम २०२६ चा अधिकृत प्रारंभ उद्या, मंगळवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद जाधव-पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
फुलोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कास वन समिती, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांच्या स्वागतासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन, वाहनतळ, बससेवा तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
‘मंडपघळ’ ठरणार यंदाचे नवे आकर्षण
कास पठारावरील पर्यटनाचा विस्तार केवळ फुलांच्या पठारापुरता मर्यादित न ठेवता परिसरातील अन्य नैसर्गिक स्थळांनाही पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंदा निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेने समृद्ध असलेले ‘मंडपघळ’ हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
कास परिसरातील निसर्गसंपदा अबाधित ठेवत पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत कास समितीचे उपाध्यक्ष प्रदीप कदम यांनी माहिती दिली.
फुलांमध्ये पाय ठेवू नका; कचरा करू नका
कास पठारावरील नाजूक रानफुलांची जैवविविधता अत्यंत संवेदनशील आहे. पर्यटकांच्या मोठ्या गर्दीमुळे फुलांमध्ये पाय पडणे, फुले तोडणे तसेच प्लास्टिक आणि इतर कचरा टाकल्याने या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी फुलांचे संवर्धन करण्यास सहकार्य करावे, फुलांमध्ये पाय ठेवू नये, फुले तोडू नयेत आणि परिसरात कचरा करू नये, असे आवाहन सातारा वन विभाग आणि कास पठार सहा गाव संवर्धन समितीने केले आहे.
प्रवेश आणि सुविधांचे दर
– प्रवेशशुल्क : २०० रुपये (१२ वर्षांवरील पर्यटक)
– शालेय सहल : ४० रुपये प्रतिविद्यार्थी
– विद्युत वाहन : १०० रुपये प्रतिव्यक्ती
– गाइड शुल्क : २०० रुपये प्रतितास (१० जणांच्या ग्रुपसाठी)
कास पठारावरील रंगीबेरंगी रानफुलांचा बहर अनुभवण्यासाठी पर्यटकांची आतुरता वाढली असून, यंदाच्या फुलोत्सवातही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, निसर्गाचा आनंद घेताना त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी पर्यटकांचीही आहे. त्यामुळे ‘फुले पाहा, फुले जपा’ या भावनेतून कासचा निसर्ग अनुभवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

