मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या लोकल प्रवासातील किरकोळ वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय पश्चिम रेल्वेवरील घटनेत आला. दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने २४ वर्षीय तरुणाच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. त्यामुळे तरुणाचा तोल जाऊन तो धावत्या लोकलमधून खाली फेकला गेला. बोरिवली परिसरात २५ ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली. या घटनेत तौसिफ शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून बोरिवली रेल्वे पोलिसांनी राहुलकुमार पांडे (३०) याला अटक केली आहे.
तौसिफ शेख हा विरार पश्चिम परिसरात राहतो. तो सुतारकाम करून उदरनिर्वाह करतो. २५ ऑगस्ट रोजी काम आटोपल्यानंतर तो रात्री सुमारे ८.४१ वाजता गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलने घरी निघाला होता. लोकल बोरिवली स्थानकाच्या दिशेने जात असताना दरवाजाजवळ उभे राहण्यावरून त्याचा राहुलकुमार पांडे याच्याशी वाद झाला.
‘आत सरका’ म्हणताच बाचाबाची
बोरिवली स्थानकात लोकल पोहोचल्यानंतर दरवाजात उभ्या असलेल्या राहुलकुमारला तौसिफने आत सरकण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेले प्रकरण लोकल बोरिवली स्थानकातून सुटल्यानंतर अधिक चिघळले. दोघांमध्ये झटापटही झाली.
याचदरम्यान संतापलेल्या राहुलकुमारने तौसिफच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तौसिफचा तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून खाली फेकला गेला. रुळांवर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हात-पायांनाही दुखापत झाली आहे.
रुग्णालयात उपचार सुरू
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. जखमी तौसिफला उपचारासाठी कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेनंतर आरोपी राहुलकुमार पांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनेमागील नेमका वाद, प्रत्यक्षदर्शी प्रवाशांची माहिती आणि हल्ल्याची परिस्थिती याबाबत रेल्वे पोलिसांकडून तपास केला जात आहे.

