पुणे प्रतिनिधी
पुण्याच्या भूमीत होणारे ऐतिहासिक १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक सोहळा न ठरता मराठी साहित्य आणि भाषेच्या पुढील शतकाच्या वाटचालीचा भक्कम पाया ठरावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. विद्यार्थी, नवोदित लेखक-कवी, ग्रामीण भागातील साहित्यिक तसेच साहित्य क्षेत्रातील विविध प्रवाहांना या संमेलनाच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी मंत्री सामंत यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. या बैठकीत संमेलनाच्या आयोजनाबरोबरच विद्यापीठे, विद्यार्थी आणि मराठी भाषा-साहित्य यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मराठी साहित्य संमेलनाची शंभरावी आवृत्ती पुण्यात होत असल्याने या संमेलनाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शंभर वर्षांच्या साहित्यिक प्रवासाचा आढावा घेत असतानाच मराठी साहित्याला पुढील शंभर वर्षांसाठी नवी दिशा देण्याचे काम या संमेलनातून व्हावे, अशी भूमिका मंत्री सामंत यांनी मांडली.
विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा
मराठी भाषेचा केवळ साहित्यनिर्मितीपुरता विचार न करता तिचा शिक्षण, संशोधन, प्रशासन, उद्योग आणि दैनंदिन व्यवहारातील वापर वाढविण्याची गरज आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी साहित्याशी जोडतानाच मराठी भाषेचे महत्त्व आणि तिच्या वापराची व्याप्ती वाढविण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठांमध्ये साहित्यिक उपक्रम, परिसंवाद, व्याख्याने, काव्यवाचन, लेखन कार्यशाळा आणि विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाचन-लेखनाची गोडी निर्माण करता येईल. त्यासाठी विद्यापीठांनी साहित्य संमेलनाशी सक्रियपणे जोडून घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वायत्त महाविद्यालये, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये मराठीचा स्वतंत्र विभाग
राज्यातील स्वायत्त महाविद्यालये तसेच स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविली गेली पाहिजे, अशी ठाम भूमिका मंत्री सामंत यांनी मांडली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषा ही केवळ एका विषयापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीशी जोडली गेली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नव्या ज्ञानशाखांशी मराठीची सांगड घालण्याचे आव्हान विद्यापीठांसमोर आहे. त्यासाठी मराठी भाषेतील अभ्यासक्रम, संशोधन आणि आधुनिक संदर्भातील साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे केवळ प्रस्थापित साहित्यिकांचे व्यासपीठ न राहता राज्याच्या कानाकोपऱ्यात लेखन करणाऱ्या साहित्यिकांनाही संधी देणारे ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागातील लेखक, कवी, कथाकार, लोककलावंत तसेच नवोदित साहित्यिकांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळाल्यास मराठी साहित्यविश्व अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सहभागालाही या संमेलनात विशेष महत्त्व देण्याची गरज आहे. नव्या पिढीला मराठी साहित्याशी जोडण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा विचार करण्यात यावा, असेही सामंत यांनी सांगितले.
पुढील शतकाची दिशा ठरविण्याची संधी
मराठी साहित्य संमेलनाची शंभरावी आवृत्ती हा मराठी साहित्यविश्वासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे मागील शंभर वर्षांच्या साहित्यिक प्रवासाचे चिंतन करण्याबरोबरच आगामी काळातील साहित्य, भाषा, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे आणि नव्या वाचन संस्कृतीच्या संदर्भातही विचारमंथन होणे अपेक्षित आहे.
मराठी भाषा आणि साहित्याला नव्या पिढीशी जोडण्यासाठी विद्यापीठे, साहित्यिक संस्था, लेखक, कवी, विद्यार्थी आणि शासन यांनी समन्वयाने काम केले, तर पुण्यातील १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरू शकते. “हे संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया ठरावे. सर्वांनी एकत्र येऊन हे संमेलन ऐतिहासिक करूया,” असा निर्धार मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

