मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील प्रसिद्ध ‘माझगांवचा मोरया’च्या रविवारी झालेल्या आगमन मिरवणुकीत अंडी फेकण्यात आल्याच्या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला. मूर्ती मंडपापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असताना शेजारच्या इमारतीतून मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त गणेशभक्तांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आरोपीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून २४ तासांत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
माझगावचा मोरया गणपती आगमन सोहळ्यादरम्यान अंडी फेकण्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून संबंधित आरोपी सापडत नाही तोवर जागेवर हटणार नसल्याची भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.#Mazgaochamorya pic.twitter.com/KUmsmohsai
— sneha kolte (@snehakolte1) August 23, 2026
माझगांव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘माझगांवचा मोरया’चा आगमन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडत होता. एलफिन्स्टन येथील गणपती कारखान्यातून निघालेली भव्य मिरवणूक मंडपाकडे मार्गस्थ झाली होती. मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि बाप्पाच्या जयघोषात परिसर दुमदुमत असतानाच मूर्ती मंडपाच्या अगदी जवळ पोहोचली असताना मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याचा प्रकार घडला.
या घटनेची माहिती मिळताच मंडळाचे पदाधिकारी आणि गणेशभक्त संतप्त झाले. संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि अनेकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले.
नागरिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत आरती करून निषेध व्यक्त केला. संशयिताला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी लावून धरली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत नागरिकांना शांततेचे आवाहन केले. मात्र, आरोपीला अटक होईपर्यंत परिसर सोडणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतल्याने तणाव कायम होता.
अखेर पोलिसांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल केला. नागरिकांशी चर्चा करून पोलिसांनी २४ तासांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव म्हणाले, “आज घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. मूर्ती आगमनस्थळी पोहोचत असतानाच इमारतीतून अंडी फेकण्यात आली. आम्ही पोलिसांकडे कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला असून पोलीस आयुक्त आणि संयुक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली आहे. पोलिसांनी कलम २९९ आणि १६० अंतर्गत गुन्हा दाखल केला असून २४ तासांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.”
दरम्यान, या घटनेमुळे माझगांव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून संबंधित प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे..

