मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या पीयूसी (वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) शुल्कात परिवहन विभागाने सुधारणा केली आहे. सुधारित दरांना मंजुरी देण्यात आली असून, राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांवर त्यानुसार शुल्क आकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता पीयूसी प्रमाणपत्रासाठी अधिक शुल्क मोजावे लागणार आहे.
महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशनकडून पीयूसी तपासणीच्या शुल्कात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा अभ्यास करण्यासाठी परिवहन विभागाने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीने अन्य राज्यांमध्ये आकारण्यात येणारे पीयूसी तपासणीचे दर तसेच विविध बाबींचा अभ्यास करून दरवाढीबाबत अहवाल परिवहन विभागाला सादर केला. त्यानंतर सुधारित शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
सुधारित दरानुसार दुचाकी वाहनांच्या पीयूसी तपासणीसाठी आता ६० रुपये आकारले जाणार आहेत. यापूर्वी हे शुल्क ५० रुपये होते. पेट्रोलवर चालणाऱ्या तिनचाकी वाहनांसाठी शुल्क १०० रुपयांवरून १२० रुपये करण्यात आले आहे. पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी १२५ रुपयांऐवजी आता १५० रुपये, तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी १५० रुपयांऐवजी १८० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, सर्व पीयूसी केंद्रांच्या मालकांनी सुधारित शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात ठळकपणे लावावेत, असे निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत. तसेच सुधारित दरांची अंमलबजावणी सर्व केंद्रांवर होत आहे की नाही, याची खातरजमा करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
विहित दरांपेक्षा अधिक शुल्क वाहनधारकांकडून आकारले जाऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, यासाठी वायुवेग पथकांनाही आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे पीयूसी केंद्रांकडून जादा शुल्क आकारले जात असल्यास त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहणार आहे.
सुधारित पीयूसी शुल्क
दुचाकी : ६० रुपये (पूर्वी ५०)
पेट्रोल तिनचाकी : १२० रुपये (पूर्वी १००)
पेट्रोल/सीएनजी/एलपीजी वाहने : १५० रुपये (पूर्वी १२५)
डिझेल वाहने : १८० रुपये (पूर्वी १५०)

