धुळे प्रतिनिधी
धुळे : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून खून केल्याच्या प्रकरणात पतीसह चौघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. धुळे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. गायकवाड यांनी हा निकाल दिला असून, सर्व आरोपींना मिळून १ लाख ३४ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणात मृत विवाहितेचा पती सागर सूर्यवंशी, सासू सुमित्राबाई सूर्यवंशी, नणंद मालती पाटील आणि नंदोई छबुलाल पाटील यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
धुळे तालुक्यातील नावरा गावातील रूपाली सागर सूर्यवंशी हिचा विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात येत असल्याची तक्रार होती. रूपालीच्या माहेरच्यांनी लग्नात कमी हुंडा दिल्याचे सांगत आरोपींनी प्लॉट खरेदीसाठी ३ लाख रुपये तसेच सागर सूर्यवंशीच्या ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियेसाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप होता. या मागणीसाठी रूपालीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला मारहाण व शिवीगाळ करण्यात येत होती.
याच छळातून ५ जुलै २०१४ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता रूपालीचा खून करण्यात आला. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ४९८(अ), १२०(ब), ३२३, ५०४ आणि ५०६ तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक यशवंत एस. साबळे यांनी तपास करून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायमूर्ती एस. जे. गायकवाड यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अजय शंकरराव सानप यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी आणि मृत रूपालीची मुलगी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. विशेषतः डॉक्टर आणि मृताच्या मुलीच्या साक्षीचा न्यायालयाने विचार केला.
साक्षी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच सर्व आरोपींना मिळून १ लाख ३४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अजय शंकरराव सानप यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तंवर यांचे मार्गदर्शन लाभले.

