मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बेस्टच्या २४ डेपोच्या जागा तब्बल ६० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या लीजवर देण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गटाने तीव्र विरोध केला असून, बेस्टच्या मौल्यवान जागा दीर्घ मुदतीसाठी खासगी वापरासाठी देणे योग्य नसल्याची भूमिका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडली आहे.
बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी डेपोच्या जागा लीजवर देण्याऐवजी उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करण्याची गरज असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. मुंबईतील महत्त्वाच्या जागा दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर दिल्यानंतर त्या पुन्हा पालिकेच्या ताब्यात येण्याबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात या जागांवर व्यावसायिक प्रकल्प किंवा मॉल उभारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
बेस्ट कर्मचाऱ्यांची थकीत देणी आणि ग्रॅच्युटीचा प्रश्नही गंभीर असून, कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत, असे पेडणेकर यांनी स्पष्ट केले. मात्र, कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी बेस्टच्या मौल्यवान डेपोच्या जागा लीजवर देणे हा योग्य पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले.
बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी यापूर्वी आर्थिक मदत आणि अनुदान देण्यात आले होते. त्याच धर्तीवर बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रवासी संख्या वाढविणे, पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे आणि प्रशासनिक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, २४ डेपो ६० वर्षांसाठी लीजवर देण्याच्या प्रस्तावामुळे बेस्टच्या मालमत्तेच्या भवितव्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी डेपोच्या जागाच लीजवर देण्याची वेळ का आली, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात असून, या प्रस्तावावरील महापालिकेतील चर्चेकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

