मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका तब्बल २५ लाख रुपये खर्च करणार असल्याच्या प्रस्तावावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर महापौर रितू तावडे यांनी स्पष्टीकरण देत, या संपूर्ण प्रक्रियेत आपला कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे.
१ ऑगस्ट २०२६ ते ३१ जुलै २०२७ या एक वर्षाच्या कालावधीसाठी महापौरांच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी २५ लाख १२ हजार ७८६ रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. यावरून महापौरांच्या प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या निधीचा वापर केला जात असल्याची टीका सुरू झाली आहे.
यावर बोलताना रितू तावडे म्हणाल्या की, “महापौर होऊन मला दोन महिने झाले आहेत. मात्र, मागील दोन वर्षांपासून हे कॉन्ट्रॅक्ट महापालिकेत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून संबंधित कंपनी महापालिकेच्या प्रसार आणि प्रचाराचे काम करत आहे. ‘माय बीएमसी’ पोर्टलच्या माध्यमातून महापौरांच्या दिवसभरातील कामांचे फोटो दाखवले जातात. माझी एवढीच मागणी होती की, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीची व्यवस्था दिवसभर माझ्यासोबत असावी.”
महापौरांच्या दालनापुरते काम मर्यादित न राहता त्या ज्या-ज्या ठिकाणी जातात, नागरिकांना भेटतात आणि काम करतात, त्याची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचावी, यासाठी आपण पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.
“हे टेंडर कोणाला द्या, कोणाची मुदत वाढवा किंवा एखाद्या कंपनीला काम द्या, असे कोणतेही पत्र मी दिलेले नाही. महापालिकेच्या माध्यमातून जी व्यवस्था सुरू आहे, त्यात व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफरचा समावेश करावा, अशी माझी मागणी होती,” असे तावडे यांनी स्पष्ट केले.
तसेच, “सर्व महापौरांना ही व्यवस्था दिली जात होती. टेंडर कोणाला द्यायचे किंवा मुदतवाढ द्यायची, यात महापौरांचा कोणताही हस्तक्षेप नाही. तांत्रिकदृष्ट्या काम देताना महापौरांच्या व्यवस्थेसाठी दोन व्यक्तींची आवश्यकता असल्याचे मला सांगण्यात आले. त्यासाठी पत्र देण्यास सांगितले आणि मी ते दिले,” असेही त्यांनी सांगितले.
संबंधित कंपनीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झालेला असल्याचे सांगत, वारंवार या प्रकरणात महापौरांचे नाव जोडून राजकारण करू नये, असे आवाहनही रितू तावडे यांनी केले. “कुठल्याही गोष्टीत महापौरांचा हस्तक्षेप नाही,” असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

