कल्याण प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याची तयारी सुरू झाली आहे. देशप्रेम आणि राष्ट्राभिमानाचा अनोखा जागर करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा घेऊन भव्य तिरंगा फेरी काढण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनसह शहरातील दहा हून अधिक सामाजिक संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
‘तिरंगा हाती घेऊया… अन् विश्वविक्रम घडवूया!’ या घोषणेसह हजारो डोंबिवलीकर या फेरीत सहभागी होणार आहेत. भारतात यापूर्वी नोंदविण्यात आलेल्या लांब तिरंगा फेरीचा विक्रम मोडून डोंबिवलीच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा आयोजकांचा निर्धार आहे.
शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक परिसरातून फेरीला सुरुवात होईल. हजारो विद्यार्थी आणि नागरिक तिरंगा हातात घेऊन फेरीत सहभागी होतील. लोकमान्य टिळक पुतळा, चार रस्ता, नेरूरकर रोडमार्गे फेरी दत्तनगर चौकाच्या दिशेने मार्गस्थ होईल.
फेरीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ फेरीचा दिमाखदार समारोप होईल. याच ठिकाणी १५० फूट उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक उपक्रमात डोंबिवली आणि परिसरातील ५० ते ५५ शाळांमधील सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याशिवाय साहित्य, सामाजिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, माजी सैनिक, स्काऊट-गाईड, एनसीसी आणि एनएसएसचे कॅडेट, तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि राष्ट्रीय व राज्यस्तरावर गौरविण्यात आलेले डोंबिवलीकरही फेरीत सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे, या उपक्रमाला पक्षीय चौकटीपलीकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुमारे २५ हजार नागरिकांच्या सहभागातून डोंबिवलीच्या सामाजिक आणि राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडणार आहे.
फेरीच्या संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर गीतांचा निनाद होणार असून विविध ठिकाणी देशभक्तीपर गीत आणि नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, कलाकार आणि सर्वसामान्य नागरिक अशा समाजातील विविध घटकांचा सहभाग या उपक्रमाला व्यापक स्वरूप देणार आहे.
त्यामुळे डोंबिवलीतील हा तिरंगा सोहळा केवळ विश्वविक्रमाच्या प्रयत्नापुरता मर्यादित न राहता राष्ट्रभक्ती, सामाजिक एकता आणि देशप्रेमाचा भव्य महासंगम ठरण्याची चिन्हे आहेत.

