चिपळूण प्रतिनिधी
चिपळूण : सिग्नल तोडणे, लेनची शिस्त न पाळणे, रस्त्यावरील सुरक्षाचिन्हांचे उल्लंघन यांसारख्या किरकोळ वाहतूक नियमभंगांसाठी वाहनचालकांना वारंवार न्यायालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज आता कमी होणार आहे. तडजोडयोग्य वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये ई-चलन अथवा निर्धारित दंड भरून प्रकरण निकाली काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि न्यायालयीन प्रक्रियेचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र वाहतूक पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून किरकोळ आणि तडजोडयोग्य नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये ई-चलन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. वाहतूक नियमभंगाची नोंद झाल्यानंतर संबंधित वाहनावर ई-चलन आकारले जाते. वाहनचालकांना महाराष्ट्र वाहतूक पोलिसांच्या अधिकृत ई-चलन प्रणालीद्वारे वाहन क्रमांक किंवा चलन क्रमांकाच्या आधारे दंडाची माहिती तपासता येते. पात्र प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरता येते.
दंड भरून तडजोडयोग्य प्रकरण निकाली निघाल्यास वाहनचालकाला अशा किरकोळ नियमभंगासाठी न्यायालयात वारंवार हजेरी लावण्याची आवश्यकता राहत नाही. ई-चलन प्रणालीमुळे कारवाईची नोंद डिजिटल स्वरूपात होत असून दंड भरण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्यास मदत होत आहे.
मात्र, ही सुविधा सर्व प्रकारच्या वाहतूक गुन्ह्यांसाठी लागू नाही. गंभीर किंवा न्यायालयीन प्रक्रियेत जाणाऱ्या प्रकरणांमध्ये संबंधित कायदेशीर प्रक्रिया कायम राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी ई-चलनाची सुविधा उपलब्ध आहे म्हणून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याची सवय लावून घेऊ नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहतूक नियमभंगाची वारंवार पुनरावृत्ती करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. वर्षभरात पाच किंवा त्याहून अधिक वाहतूक नियमभंग नोंदवल्यास वाहनचालकाच्या परवान्यावर निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे दंड भरण्यापेक्षा वाहतूक नियमांचे पालन करणे हाच सुरक्षित आणि योग्य पर्याय असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
– समद बैग, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोटे

