अमरावती प्रतिनिधी
अमरावती : गोरगरिबांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने उघडलेल्या बँक खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अमरावती शहर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या खात्यांमधून तब्बल ७१ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे तपासात समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख अमीन शेख लतीफ, रवी विश्वनाथ गडलिंग (रा. राहुलनगर, बिच्छूटेकडी) आणि आकाश दीपक जयसिंघानी (रा. पोद्दार बगीचा, रामनगर, वर्धा) यांचा समावेश आहे. तिघेही सध्या अमरावती पोलिसांच्या कोठडीत असून त्यांच्या आंतरराज्यीय संबंधांचा तपास सुरू आहे.
आठवडाभरापूर्वी शहर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. बँक ऑफ इंडिया, अमरावती येथील एका खात्यात देशातील तब्बल २० राज्यांतील सायबर फसवणुकीची रक्कम जमा होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर खात्याची केवायसी, व्यवहार आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली असता हे खाते शेख अमीन शेख लतीफ यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले.
तांत्रिक तपासात या खात्यात जमा झालेली रक्कम पुढे विविध बँक खात्यांमध्ये तसेच इतर माध्यमांतून हस्तांतरित केली जात असल्याचे उघड झाले. हे खाते ऑनलाइन गेमिंग, क्रिप्टोकरन्सी व्यवहार आणि सायबर फसवणुकीसाठी ‘म्यूल अकाउंट’ म्हणून वापरले जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
तपासादरम्यान शेख अमीन याने पैशाच्या मोबदल्यात हे खाते रवी गडलिंगला उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. त्यानंतर रवी गडलिंगने तेच खाते आकाश जयसिंघानीच्या वापरासाठी दिल्याची माहितीही पोलिसांच्या तपासात उघड झाली.
आकाश जयसिंघानी याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून चार सिमकार्ड, विविध बँक खात्यांच्या व्यवहारांची कागदपत्रे, काही महत्त्वाच्या चिठ्ठ्या आणि दोन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी कमिशन किंवा इतर कोणत्याही आमिषाला बळी पडून आपले बँक खाते, एटीएम कार्ड, यूपीआय किंवा बँकेची गोपनीय माहिती इतरांच्या ताब्यात देऊ नये. स्वतःचे बँक खाते दुसऱ्याला वापरण्यास देणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे आवाहन सायबर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार यांनी केले.

