स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : रात्रीच्या वेळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या हातातील बॅगा हिसकावून पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बीकेसी पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत अटक केली आहे. या कारवाईमुळे चार गुन्ह्यांची उकल झाली असून आरोपीविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
बीकेसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास मालाड येथील रहिवासी व व्यवसायाने वकील असलेल्या एका २६ वर्षीय महिला रिक्षाने घरी जात असताना सीएसटी रोडवरून कुर्ला ते सांताक्रूज मार्गावर, हंसब्रुगा जंक्शनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटार स्कूटरवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने रिक्षामध्ये हात घालून त्यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथक, तडीपार पथकाचे अधिकारी तसेच दिवस व रात्रपाळीतील अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, तसेच मानवी माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. अवघ्या ३६ तासांत पोलिसांनी इलियास नजीम खान (वय २२, राहणार शेल्टर हाऊस कंपाऊंड, लाल मिट्टी रोड, वांद्रे पश्चिम) याला ताब्यात घेऊन अटक केली.
तपासादरम्यान आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध निर्मल नगर, खेरवाडी, अंधेरी रेल्वे, वांद्रे रेल्वे आदी पोलीस ठाण्यांत चोरी, जबरी चोरी आणि इतर गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत बीकेसी येथील सध्याच्या गुन्ह्यासह निर्मल नगर, खेरवाडी आणि वाकोला पोलीस ठाण्यातील अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. आरोपीकडून या गुन्ह्यांबाबत अधिक तपास सुरू असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर परकाळे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम बागल, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बांद्रा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचेही विशेष सहकार्य लाभले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बीकेसी पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे महिलांना लक्ष्य करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश आले असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या गस्तीसह विशेष मोहीम अधिक प्रभावी केली आहे.


