मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो महिला प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दिशेने रेल्वे प्रशासनाने पाऊल टाकले आहे. महिला डबा नेमका कुठे थांबतो हे सहज ओळखता यावे आणि गर्दीच्या वेळी सुरक्षितपणे चढ-उतार करता यावा, यासाठी स्थानकांवर ‘पिंक प्लॅटफॉर्म’ संकल्पना राबविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
मुंबई रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने हा प्रस्ताव मांडला असून, अलीकडेच मध्य रेल्वे मुख्यालयात झालेल्या उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती (SRUCC) च्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावानुसार, ज्या ठिकाणी लोकलमधील महिला डबा थांबतो त्या प्लॅटफॉर्मवरील भागाला गुलाबी रंगाने विशेष चिन्हांकित करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे महिला प्रवाशांना ट्रेन येण्यापूर्वीच योग्य ठिकाणी उभे राहता येईल. विशेषतः प्रथमच लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांना महिला डबा शोधणे अधिक सोपे होईल. सध्या गर्दीमुळे अनेक महिला चुकीच्या ठिकाणी उभ्या राहतात. परिणामी, महिला डब्यापर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागते आणि चढ-उतार करताना अडचणींचा सामना करावा लागतो.
सुरक्षिततेलाही मिळणार चालना
मुंबई रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या मते, ‘पिंक प्लॅटफॉर्म’ संकल्पनेमुळे महिला प्रवाशांच्या प्रतीक्षा क्षेत्रावर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येईल. या भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अधिक प्रभावी कव्हरेज, रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांची योग्य तैनाती आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे सोपे होणार आहे.
तसेच, गुलाबी रंगाच्या स्पष्ट चिन्हांमुळे इतर प्रवाशांनाही हा भाग महिला डब्यासाठी राखीव असल्याची जाणीव होईल. त्यामुळे अनावश्यक गर्दी, गोंधळ आणि धक्काबुक्की कमी होऊन महिला प्रवाशांचा चढ-उतार अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने होण्यास मदत होईल.
पायलट प्रकल्पाची शक्यता
रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावाची सकारात्मक दखल घेतली असून त्याचा सविस्तर अभ्यास सुरू आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सुरुवातीला मुंबईतील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर पायलट प्रकल्प म्हणून ‘पिंक प्लॅटफॉर्म’ची अंमलबजावणी केली जाऊ शकते. हा उपक्रम यशस्वी ठरल्यास भविष्यात मुंबईतील सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तो लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


