आकोला प्रतिनिधी
अकोला : अकोल्यातील बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घटनेमुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिस दलावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पवन उद्धवराव वडगावे असे असून तो पोलीस कर्मचारी आहे. आरोपीने ज्या घरात वास्तव्यास होता, त्या घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र, नंतर लग्नास नकार दिल्यानंतर मानसिक धक्क्यात गेलेल्या पीडितेने 13 जून 2026 रोजी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर पीडिता तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज देत कोमात होती. अखेर 1 ऑगस्ट 2026 रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होऊन 13 दिवस उलटल्यानंतरही आरोपी फरार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. आरोपीच्या अटकेसाठी मोर्चाही काढण्यात आला होता.
जनतेच्या वाढत्या दबावानंतर अखेर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत पवन वडगावे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


