कोलकाता :
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल २८.५ कोटी रुपयांची रोकड आणि सुमारे १५ किलो सोने जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे २१.५ कोटी रुपये असल्याने या कारवाईत सुमारे ५० कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत झाला आहे. घरात साठवून ठेवलेल्या नोटांचा ढीग एवढा मोठा होता की, त्या मोजण्यासाठी वापरण्यात आलेली बँकेची तब्बल पाच चलन मोजणी यंत्रे बंद पडल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.
Commendable job by our Law Enforcement personnel for the crackdown on Sand Mafia.
Following a precise operation based on source based information, Birbhum Police conducted a major raid under Mohammad Bazar PS targeting the hideout of illegal sand mafia Tullu Mondal alias Mohd… pic.twitter.com/Ln4XJCWKKY
— Suvendu Adhikari (@SuvenduWB) July 29, 2026
या प्रकरणी पोलिसांनी मिनार मंडल याला अटक केली असून, तो पूर्वी राज्य परिवहन विभागात बस चालक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर त्याने दगड व्यवसायात प्रवेश केला. सध्या तो फरार दगड व्यावसायिक तुलू मंडल उर्फ मोहम्मद नजीबुद्दीन याचा व्यवस्थापक आणि मेहुणा असल्याचे तपासात समोर आले आहे.
गुप्त माहितीवरून मध्यरात्री धाड
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री मिनार मंडलच्या घरावर छापा टाकला. सुरुवातीला सुमारे २० कोटी रुपयांची रोकड सापडली. मात्र रात्रभर नोटा मोजल्यानंतर जप्त रकमेचा आकडा वाढून २८.५ कोटी रुपयांवर पोहोचला. ही संपूर्ण रोकड धातूच्या पेट्यांमध्ये भरून मोहम्मद बाजार पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून, पुढील प्रक्रियेनंतर ती बँकेत जमा करण्यात येणार आहे.
याच कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी एक किलो वजनाच्या १४ सोन्याच्या वळ्या आणि प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाची १० सोन्याची बिस्किटे जप्त केली. या सोन्याची अंदाजित किंमत २१.५ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकशीत धक्कादायक दावा
अटकेनंतर चौकशीदरम्यान मिनार मंडलने जप्त केलेली रोकड आणि सोने हे फरार दगड व्यापारी तुलू मंडल यांचे असल्याचा दावा केला. या कोट्यवधी रुपयांची रोकड आणि सोन्याचा स्रोत काय आहे, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता वेगाने सुरू करण्यात आला आहे.
महसूल अपहाराचा संशय
जप्त करण्यात आलेली रोकड ही दगड खाणींमधून गोळा करण्यात आलेल्या सरकारी महसुलाचा भाग असू शकते, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. हा महसूल सरकारी तिजोरीत जमा करण्याऐवजी अपहार करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे.
२०१६-१७ च्या सुमारास तुलू मंडल बीरभूममधील दगड खाणींमध्ये डीसीआर (जिल्हा कर संकलन) व्यवस्थापनाशी संबंधित काम पाहत होता. त्या काळात सरकारी महसूल संकलनात कोट्यवधी रुपयांच्या अनियमितता झाल्याचा आरोप आहे.
भाजपने दावा केला आहे की, पूर्वी सरकारी खात्यात दररोज केवळ २० ते ३० लाख रुपये जमा होत होते; मात्र आता त्याच भागातून दरमहा सुमारे ८३ कोटी रुपयांचा महसूल जमा होत आहे. त्यामुळे पूर्वीच्या महसूल व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आधीही तपास यंत्रणांच्या रडारवर
तुलू मंडल यांचे नाव यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये समोर आले होते. २०२२ मध्ये जनावरांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात सीबीआयने त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावले होते. मात्र या सर्व आरोपांबाबत अद्याप न्यायालयाचा अंतिम निर्णय झालेला नाही.
१०० कोटींच्या लग्नाची पुन्हा चर्चा
या कारवाईनंतर तुलू मंडल यांच्या मुलीच्या २०२४ मधील भव्य लग्नाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या लग्नावर तब्बल १०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या सोहळ्याला बंगाली चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री झरीन खान यांनी उपस्थिती लावल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
मुख्यमंत्री म्हणाले, “भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलता”
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करत भ्रष्टाचाराविरोधातील सरकारचे ‘शून्य सहनशीलता’ धोरण कायम राहील, असे स्पष्ट केले. सोशल मीडियावर त्यांनी या कारवाईचे छायाचित्रे शेअर करत वाळू माफिया आणि अवैध आर्थिक व्यवहारांवर मोठा घाव असल्याचे म्हटले. सार्वजनिक संपत्तीची लूट करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि अशा टोळ्यांविरोधातील कारवाया सुरूच राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
टीएमसीमध्ये आरोप-प्रत्यारोप
या कारवाईनंतर तृणमूल काँग्रेसमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पक्षातील विविध गटांनी आरोपींशी संबंध असल्याचा आरोप एकमेकांवर केला आहे.
टीएमसी आमदार कुणाल घोष यांनी जप्ती झालेल्या व्यक्तींचे काही नेत्यांशी निकटचे संबंध असल्याचा दावा करत गरज पडल्यास त्या नेत्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तर खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बीरभूममधील प्रभावशाली नेत्यांशी आरोपींचे संबंध तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली.
दुसरीकडे, अनुब्रता मंडल गटाचे समर्थक मानले जाणारे आमदार प्रसून बॅनर्जी यांनी एवढ्या मोठ्या कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक करत या प्रकरणातील प्रत्येक दोषी व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधील अवैध दगड व्यवसाय, महसूल अपहार आणि राजकीय संरक्षणाच्या आरोपांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

