मुंबई प्रतिनिधी
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील सर्वात शांत, संयमी आणि विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करत त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. जवळपास तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये रहाणेचा दाटलेला कंठ आणि डोळ्यांतील अश्रू चाहत्यांनाही भावूक करून गेले.
व्हिडीओच्या शेवटी रहाणेने मराठीत उच्चारलेलं एक वाक्य सर्वांच्या मनाला भिडलं “तुम्ही मला कधी परकं मानलं नाही.” या एका वाक्यातून त्याने चाहत्यांप्रती असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली.
अंजिक्य रहाणे की भावुक विदाई 🥹
जैसे ही अजिंक्य रहाणे ने अपने संन्यास की घोषणा की,
भारत की कैप नंबर 278 का सफर हमेशा के लिए समाप्त हो गया। 🥹❤️ pic.twitter.com/EJ6mLuS1hl
— Parveen Udaan (@gkparveenudaan) July 30, 2026
दीर्घकाळ भारतीय संघाबाहेर राहूनही रहाणेने कधीही नाराजी व्यक्त केली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत त्याने अनेकदा भारतीय संघात पुनरागमन केलं. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीही त्याची निवड झाली होती. मात्र, यानंतर संधी न मिळाल्याने अखेर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.
आपल्या संदेशात रहाणे म्हणाला, “प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात आणि एक शेवट असतो. ती वेळ आल्यावर ती स्वीकारून पुढे जाणं आवश्यक असतं. फलंदाज म्हणून मी नेहमी योग्य टायमिंगवर विश्वास ठेवला आणि आज निवृत्ती घेण्यासाठीही हीच योग्य वेळ असल्याचं मला वाटतं.”
डोंबिवलीहून सरावासाठी प्रवास करणाऱ्या एका सामान्य मुलापासून भारतीय संघाचा विश्वासू खेळाडू बनण्यापर्यंतचा प्रवास आठवत रहाणे म्हणाला, “भारताची कॅप घालणं हेच माझं स्वप्न होतं. मी नेहमी देश आणि संघाला स्वतःपेक्षा वरचं स्थान दिलं आणि पूर्ण प्रामाणिकपणे क्रिकेट खेळलो.”
फर्स्ट क्लास क्रिकेटपासून भारतीय संघापर्यंतचा प्रवास आठवत त्याने भारतीय क्रिकेटचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. पुढील काळात युवा खेळाडूंना मार्गदर्शन करून क्रिकेटला काहीतरी परत देण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली.
निवृत्तीच्या घोषणेनंतर रहाणेने BCCI, MCA, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, IPL फ्रँचायझी, पत्नी राधिका, कुटुंबीय, मित्र आणि संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे मनापासून आभार मानले. भारतीय क्रिकेटमधील एका शांत, संयमी आणि लढवय्या अध्यायाचा यानिमित्ताने भावूक शेवट झाला.


