खापरखेडा प्रतिनिधी
खापरखेडा येथील वलनी वस्ती परिसरातील धम्मक्रांती बुद्ध विहारात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पितळेची मूर्ती आणि तांब्याचा कलश असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, खापरखेडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी धम्मक्रांती बुद्ध विहाराचे अध्यक्ष सिद्धार्थ दामोदर भिमटे यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, विहारात गौतम बुद्ध यांची पितळेची मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुमारे एक फूट उंचीची पितळेची मूर्ती तसेच तांब्याचा कलश ठेवण्यात आला होता. विहारात दर पौर्णिमेला स्वच्छता आणि वंदना कार्यक्रम नियमितपणे आयोजित केला जातो.
२४ जुलै रोजी सायंकाळी विहाराची साफसफाई करून दरवाजा बंद करण्यात आला होता. त्यावेळी दरवाजा व्यवस्थित बंद होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर २६ जुलै रोजी विहार उघडण्यात आला असता दरवाजाच्या कडी-कोयंड्याचे नुकसान झाल्याचे आढळले. मात्र, २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वच्छता करण्यासाठी विहार उघडले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पितळेची मूर्ती आणि तांब्याचा कलश चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
चोरीस गेलेल्या पितळेच्या मूर्तीची किंमत सुमारे १५ हजार रुपये, तर तांब्याच्या कलशाची किंमत ३ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासानुसार ही चोरी २४ ते २६ जुलैदरम्यान झाल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळावरील पुरावे, परिसरातील माहिती तसेच उपलब्ध तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास खापरखेडा पोलीस करीत आहेत.


