मुंबई प्रतिनिधी
आजकाल पालकांची आपल्या मुलांवर अभ्यास करण्यासाठी सारखी सक्ती असते, तर मुलं मात्र टीव्ही आणि मोबाईलमध्येच जास्त वेळ घालवत असल्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. त्यातच अनेक मुलांना गणिताची खूप भीती वाटते, त्यामुळे हा विषय त्यांना खूप कठीण वाटतो. मुलांच्या मनातील गणिताची ही भीती पळवून लावण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये गणिताची गोडी निर्माण करण्यासाठी सांताक्रुझ पूर्व येथील ‘पंचशील बुद्ध विहार, शिवनगर, कालिना’ येथे एका महिन्याच्या विशेष कार्यशाळेची नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ६५४ यांच्या मार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, मुलांवर अभ्यासाचा कोणताही ताण न देता विविध खेळांमधून आणि सोप्या क्लुप्त्यांचा वापर करून त्यांना गणिताचा अभ्यास हसत-खेळता आणि आनंददायी पद्धतीने शिकवला जाणार आहे. ही कार्यशाळा प्रा. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून, संदेश गायकवाड यांच्या सहकार्याने याचे सुंदर नियोजन करण्यात आले आहे. मुलांनी ताणतणाव बाजूला सारून गणिताचा आनंद घ्यावा, हा यामागील मुख्य उद्देश असून परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संपर्क व अधिक माहितीसाठी:
• आयोजक: ॲड. सुशांत लोखंडे – 8652143873
• समन्वयक: संदेश गायकवाड – 9821851318


