मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. २४ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मुंबईतील पाच नामांकित स्पोर्ट्स क्लबांसह राज्यातील एकूण ११ अन्न आस्थापनांचे एफएसएसएआय (FSSAI) परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. याच कारवाईदरम्यान राज्यभरातून तब्बल ₹१ कोटी ४ लाख ६३ हजार ३०५ किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून ३५ धाडी टाकण्यात आल्या.
मुंबईतील द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, आर.के. जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे पूर्व) आणि द विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब येथे FDA च्या तपासणीत गंभीर अनियमितता उघडकीस आल्या. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव, बुरशी लागलेले अन्न, कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवणे, तापमान नियंत्रणातील त्रुटी, तसेच कर्मचाऱ्यांकडून हातमोजे व सुरक्षा साधनांचा वापर न करणे अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्याने संबंधित क्लबांचे अन्न व्यवसाय परवाने तातडीने निलंबित करण्यात आले.
याशिवाय मुंबईतील पूर्णिमा रेस्टॉरंट तसेच पालघरमधील एका केटरिंग संस्थेवरही कारवाई करून त्यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. पुणे विभागातील सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधील पाच हॉटेल, रेस्टॉरंट आणि कँटीनवरही अशीच कारवाई करण्यात आली.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरील विशेष मोहिमेत सातारा जिल्ह्यात कृत्रिम दूध तयार करणाऱ्यांविरोधात कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले. तर नाशिकमधील एका दूध संकलन केंद्रातून २०० लिटर गायीचे दूध जप्त करण्यात आले. या मोहिमेत एकूण २०५ लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ₹८,६९६ इतकी आहे.
प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांविरोधातही राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत १८ गुन्हे दाखल करण्यात आले, २२ जणांना अटक करण्यात आली आणि सुमारे ₹४६.५१ लाख किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. तसेच सात आस्थापने सील करण्यात आली असून ₹२१ लाख किमतीची तीन वाहनेही जप्त करण्यात आली.
इतर अन्नपदार्थांवरील कारवाईत राज्यभरातून २१,४३४.१३ किलो संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अंदाजे किंमत ₹५८.०४ लाख इतकी आहे. दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने आणि खाद्यतेल यांची तपासणी करताना १६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
FDA ने राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर अन्न आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत ८१ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, ११ अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले, तर एका आस्थापनाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली.
विशेष कारवाईदरम्यान नागपूरमध्ये कृत्रिम रंग वापरून तयार करण्यात येणारी शेव आणि तांदळाचे पीठ जप्त करण्यात आले. हिंगोली येथे सैल स्वरूपात विक्रीस ठेवलेली तीन किलो ताजी शेंगदाणा चटणीही जप्त करण्यात आली. या सर्व नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू असून अहवालानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले असून भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.


